वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा जेतेपदाचा मानकरी ठरण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात अंतिम फेरीचा सामना 2 नोव्हेंबरला होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला, तर दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. आता अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहेत. भारताने यापूर्वी दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस पदरात निराशा पडली. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकन संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजय मिळवतो? याची उत्सुकता वाढली आहे. पण असं सर्व वातावरण असताना टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिकेच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. अंतिम फेरीच्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. नवी मुंबईच्या स्थितीबाबत वर्तवलेला अंदाज पाहता चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
भारत दक्षिण अफ्रिका सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, रविवारी नवी मुंबईत दिवसा आणि रात्रीही पावसाची शक्यता आहे. ही शक्यता 63 टक्के इतकी आहे. सामना सुरु झाल्यानंतर संध्याकाळी 4 ते 7 दरम्यान पावसाची शक्यता अधिक आहे. म्हणजेच या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तसं झालं तर षटकं कमी करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण पाऊस जास्तच असेल तर मग हा सामना राखीव दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबरला होईल. पण या दिवशीही पावसाची शक्यता आहे. सोमवारी 55 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राखीव दिवशीही पाऊस असं बोललं जात आहे.
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील अंतिम फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. उपांत्य फेरीपर्यंत सामना रद्द करण्याची वेळ आली तर गुणतालिकेच्या आधारावर पुढचं तिकीट दिलं जात होतं. पण अंतिम फेरीत विजेता घोषित करण्यासाठी काय समीकरण असेल? अंतिम फेरीसाठी तसं काही समीकरण नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना विजेता घोषित करण्यात येईल.