Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांमध्ये अश्रू; ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर भावुक
esakal November 01, 2025 06:45 PM

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील लढतीत सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघावर पाच विकेट व नऊ चेंडू राखून विजय साकारला व तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

नाबाद १२७ धावा फटकावणारी जेमिमा रॉड्रिग्ज या देदीप्यमान विजयाची शिल्पकार ठरली. चोहोबाजूंनी भारतीय संघ व जेमिमा रॉड्रिग्जवर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला; मात्र शतकी खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

जेमिमा रॉड्रिग्ज हिने पत्रकार परिषदेत भावुक उद्गार काढताना म्हटले, की गेला काही काळ माझ्यासाठी क्लेशदायक ठरला. माझ्या बॅटमधून मोठी खेळी होत नव्हती. या विश्वकरंडकादरम्यान मला बाहेरही बसवण्यात आले. अशावेळी माझे आई-वडील यांचा मोलाचा पाठिंबा मिळाला. तसेच भारतीय संघातील अरुंधत्ती रेड्डी, स्मृती मानधना व राधा यादव या खेळाडूही माझ्यासोबत होत्या, यामुळे मी सावरले.

जेमिमा रॉड्रिग्ज हिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबतच्या भागीदारीबाबत म्हटले, की आम्ही दोघी जेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी करीत होतो, तेव्हा भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर होते; मात्र हरमनप्रीत बाद झाली आणि माझ्यावरील जबाबदारी वाढली. मी थकले होते.

त्यामुळे माझे फटकेही चुकत होते; मात्र हरमनप्रीत बाद झाल्यानंतर भारताला जिंकून देईपर्यंत खेळपट्टीवर उभे राहायचे ठरवले. तसेच त्यानंतर खेळपट्टीवर येत असलेल्या फलंदाजांसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात यश मिळाले. दीप्ती शर्मा, रिचा घोष यांनीही छान फलंदाजी केली.

अनुभवातून शिकले

जेमिमा रॉड्रिग्जला या डावात दोन वेळा जीवदान मिळाले. एलिसा हिली व तहलिया मॅग्रा या दोघींनी तिचे झेल सोडले. याबाबत ती म्हणाली, मी थकले होते. त्यामुळे आक्रमक फटके मारू की खेळ अखेरच्या षटकांपर्यंत घेऊन जाऊ, अशी द्विधा मनस्थिती होती; पण प्रत्येक अनुभवातून शिकायला मिळते. या लढतीमधून संयमी फलंदाजी करायला हवी, हे मी शिकले.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय डी. वाय. पाटीलवर पाठलाग शक्य

जेमिमा रॉड्रिग्ज हिने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग शक्य असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. ती म्हणाली, ऑस्ट्रेलियन संघाने ३० धावा कमी केल्या, असे वाटू लागले. तसेच येथील खेळपट्टीवर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो, याचा विश्वास होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.