धूम्रपान सोडण्याचा विचार करणारे अनेकजण ‘हर्बल सिगारेट’ हा आरोग्यदायी पर्याय आहे, असं मानतात. पण खरंच या सिगारेट्स तंबाखूच्या ऐवजी सुरक्षित आहेत का? नाव जरी हर्बल असलं, तरी त्यामागचं सत्य थोडं वेगळंच आहे. (herbal cigarette safe or dangerous)
हर्बल सिगारेट म्हणजे काय?
हर्बल सिगारेट म्हणजे अशा सिगारेट ज्यामध्ये तंबाखू किंवा निकोटीन नसतं. त्याऐवजी मार्शमॅलो पाने, गुलाबाच्या पाकळ्या, लाल क्लोव्हर, तुळस, ज्येष्ठमध यांसारख्या औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्यामुळे लोकांना वाटतं की हा सुरक्षित पर्याय आहे. पण हे केवळ अर्धं सत्य आहे.
कमी व्यसनकारक पण तरीही हानिकारक
हर्बल सिगारेटमध्ये निकोटीन नसल्यामुळे व्यसन कमी होतं, पण त्या पूर्णपणे निरुपद्रवी नाहीत. कारण ज्या वेळी या औषधी वनस्पती जळतात, तेव्हा त्यातूनही टार, कार्बन मोनोऑक्साइड आणि इतर हानिकारक रसायने निर्माण होतात. काही वेळा ही प्रमाणं तंबाखू सिगारेटपेक्षाही जास्त असतात.
‘नैसर्गिक’ म्हणजे सुरक्षित असं नाही
अनेकांचा गैरसमज आहे की नैसर्गिक गोष्टी नेहमीच आरोग्यासाठी चांगल्या असतात. पण हर्बल सिगारेटचं धूम्रपान फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकतं. या धुरात असलेली रसायने फुफ्फुसाचा कर्करोग, दमा, खोकला, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या निर्माण करू शकतात. आजपर्यंत कोणत्याही अभ्यासाने हर्बल सिगारेट पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सिद्ध केलेलं नाही. “सिगारेट” हा शब्द जिथे येतो, तिथे धूर आणि जळण हे घटक असतातच आणि हे दोन्ही शरीरासाठी घातक आहेत.
तज्ञ काय सांगतात?
तज्ञांच्या मते, कोणतीही सिगारेट ती हर्बल असो वा तंबाखूची आरोग्यासाठी धोकादायकच असते. त्यामुळे “निकोटीन नसल्यामुळे हानिकारक नाही” हा विचार चुकीचा आहे.
मग योग्य पर्याय कोणता?
धूम्रपान सोडण्यासाठी हर्बल सिगारेट वापरण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, निकोटीन गम, पॅचेस किंवा समुपदेशन यासारखे वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करा. तसंच, धूम्रपानाविरोधी मोहिमा जसं जागतिक धूम्रपान निषेध दिन यांचा आधार घ्या आणि प्रेरणा मिळवा.
हर्बल सिगारेट ही तंबाखू सिगारेटची सुरक्षित जागा घेऊ शकत नाही. ती केवळ “नैसर्गिक” असल्याचं लेबल लावून स्वतःला निरुपद्रवी दाखवते. पण वास्तवात तिचा धूर, रसायने आणि दीर्घकाळाचा परिणाम शरीरासाठी धोकादायक ठरतो.