Facebook डॉ. नरेंद्र दाभोलकर
महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून नरेंद्र दाभोलकरांकडे पाहिलं जात असे. 1 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन.
दाभोलकरांच्या हत्येच्या घटनेनंतर 'माणूस मारता येतो, विचार नाही' अशी घोषणात देत 'आम्ही सारे दाभोलकर' म्हणत शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते, आणि दरवर्षी उतरतात.
यातूनच दाभोलकरांनी माणसांना विवेकवादी करण्यासाठी केलेलं कार्य किती मोलाचं आहे, हे लक्षात यावं!
विवेकी विचारांसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या डॉ. दाभोलकरांच्या प्रवासाबद्दलही आपण जाणून घेऊया.
कबड्डीतला 'नरूभाऊ'डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या काळातील नावाजलेले कबड्डीपटू होते. शालेय किंवा महाविद्यालयीन स्पर्धांपुरतं नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
डॉ. दाभोलकर ज्यावेळी कबड्डीच्या मैदानात सक्रीय होते, तेव्हा त्यांना 'नरूभाऊ' म्हटलं जाई. प्रतिस्पर्ध्याच्या हाती न लागण्यासाठी पायात स्प्रिंग लावल्यागत उडी मारण्याचं दाभोलकरांमध्ये कसब होती आणि कबड्डीत ही उडी 'हनुमान उडी' प्रसिद्ध झाली.
Facebook/Milind Joshi
कबड्डीतल्या कामगिरीसाठी डॉ. दाभोलकरांना महाराष्ट्र सरकारनं 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार' या सर्वोच्च पुरस्कारानंही गौरवलंय.
लढण्याची प्रेरणा मला कबड्डीतून मिळाल्याचं डॉ. दाभोलकर सांगत.
Facebook/Milind Joshi
बरं केवळ कबड्डीपटूच नव्हे, तर क्रीडा संघटक, क्रीडा स्तंभलेखक, सामन्याचा धावता निवेदक अशा भूमिकाही त्यांनी त्या काळात निभावल्या. क्रीडा क्षेत्रात दाभोलकर जवळपास 20 वर्षं रमले.
एक गोष्ट नमदू करायला हवी, ती म्हणजे, कबड्डीवरचं मराठीतलं पहिलं पुस्तक डॉ. दाभोलकरांनीच लिहिलंय.
रुग्णांचा डॉक्टर समाजाचा डॉक्टर झाला...खरंतर नरेंद्र दाभोलकर हे वैद्यकीय पेशातले.
साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. मग साताऱ्यातच त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
दाभोलकर नेहमी नम्रपणे नमूद करत की, गर्दीतले एक न होता वेगळं काही करायचं असं काहीही मनात नव्हतं. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरू केला.
मात्र, लोकांच्या आजारांवर उपचार करणारा हा डॉक्टर समाजाच्या आजारावर उपचार कधीपासून करू लागला? तर त्याचं उत्तर याच काळात सापडतं.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
2007 साली डॉ. दाभोलकरांनी 'मागे वळून पाहताना' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. त्यात त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या भूमिका, वाटचालीसह काही वैयक्तिक किस्सेही सांगितलेत.
या लेखात दाभोलकर सांगतात, 'वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय करत असतानाच 1971 साली 'समाजवादी युवक दल' नावानं सामाजिक काम सुरू केलं. यात काही मित्रच होतो. 70-80 च्या दशकात अशा संघटनांच्या अनेक छत्र्या उगवल्या, त्यांना 'अॅक्शन ग्रुप' म्हटलं जाई. पण निर्माण होऊन काही काळ चमकणे आणि मग अस्तंगत होणं, अशीच वाटचाल यांपैकी अनेक संघटनांच्या वाट्याला आली. 1982 साली 'समाजवादी युवक दल'नंही श्वास घेणं थांबवलं.'
'समता आंदोलन' नामक संघटनेत ही संघटना विलीन केली गेली. मात्र, तिची धडपडही दोन वर्षांत थांबली.
दाभोलकरांना आजारी समाजाला बरं करण्यासाठी प्रवृत्त केलं, ते बी. प्रेमानंद यांनी. आता बी. प्रेमानंद हे कोण, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ते विवेकवादी विचारवंत होते. बुवाबाजी उघड करण्याचा त्यांनी जणू ध्यासच घेतला होता. देशभर फिरून त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार केला.
1985 च्या सुमारास पुण्यातील लोकविज्ञान संघटनेनं बी. प्रेमानंद यांना आमंत्रित केलं होतं.
बी. प्रेमानंद यांनी बुवाबाजीच्या चमत्कारांची केलेली भांडाफोड पाहून डॉ. दाभोलकरांनीही काही मित्रांच्या मदतीनं पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात असे प्रयोग करू लागले.
बुवाबाजीचे चमत्कार आणि त्यांची भांडाफोड पाहण्यासाठी बरीच गर्दी जमत असे. महाराष्ट्रात हे काम रुजायला हवं, ती महाराष्ट्राची गरज आहे, असा विचार करून दाभोलकरांनी या कामाला स्वत:ला झोकून दिलं.
1985 नंतर दोन वर्षं दाभोलकर महाराष्ट्रभर फिरले आणि 1989 साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलानाच्या संस्थात्मक कामास सुरुवात केली.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीची स्थापना'अंधश्रद्धा निर्मुलन' आणि 'डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे शब्द जणू समानार्थी व्हावेत, इतके एकमेकांना जोडून येतात. याचं कारण डॉ. दाभोलकरांनी लोकांना अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा वसा घेतला होता. हे काम त्यांची ओळख बनली.
डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम खरंतर 1981-82 पासूनच सुरू केलं होतं. त्यावेळी ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीत कार्यरत होते. मात्र, पुढे म्हणजे 1989 साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची त्यांनी स्थापना केली आणि शेवटपर्यंत ते या समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करत राहिले.
Milind Joshi
लेखक प्रभाकर नानावटी हे स्वत: बरीच वर्षं अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सक्रीय कार्यकर्ते राहिलेत. विज्ञानविषयक पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत.
नानावटी लिहितात, 'अंधश्रद्धा निर्मुलन समितीची उभारणी केल्यानंतर चार गोष्टींवर प्रामुख्यांनी दाभोलकरांनी भर दिला - 1) शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, 2) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार, 3) धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा आणि 4) व्यापक समाजपरिवर्तनवादी संघटनांबरोबर सहयोग.'
नानावटी पुढे दाभोलकारंबद्दल गौरोवद्गार काढताना म्हणतात, "या चारी सूत्रांचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केल्यास या सूत्रांचा आशय पन्नास टक्क्यांपर्यंत तरी समाजमानसात रुजवण्यासाठी यातील प्रत्येक सूत्राचे कार्य करणार्या स्वतंत्र अशा चार संघटनांची गरज भासली असती. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्यातील संघटनकौशल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्गाला आकर्षित करून या चारही सूत्रांच्या कार्यवाहीसाठी आपापली जात, धर्म, वर्ग सोडून एकत्रितपणे कार्य करणारे कार्यकर्ते घडविले."
अंधश्रद्धा निर्मुलन समिती ही अग्निशामक दलासारखी कुणीतरी बोलावल्यावर बुवा-बाबांना पकडणारी संघटना होऊ नये, यासाठी दाभोलकर कायम प्रयत्नशील राहिले. जनमानसात मूळातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार करण्याची पद्धत इत्यादी गोष्टी निर्माण व्हाव्यात, असा उद्देश त्यांचा कायम राहिला.
'शोध भुताचा, बोध मनाचा', 'चमत्कार घडवा, यात्रा अडवा', 'वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प', 'विज्ञान बोध वाहिनी' इत्यादी अनेक यात्रा, उपक्रम समितीच्या माध्यमातून आतापर्यंत राबवले गेले.
बुवाबाजी, भोंदू बाबांची फसवेगिरी, जादूटोणा या गोष्टींची भांडाफोड करतानाच, धोरणात्मक पातळीवर बदल घडवण्यासाठीही दाभोलकरांनी प्रचंड प्रयत्न केले.
लेखन, पुरस्कार, पत्रकारिता...डॉ. दाभोलकरांनी समाजाला अंधश्रद्धेच्या 'तिमिरातून तेजाकडे' आणण्यासाठी ज्याप्रकारे वैयक्तिक आणि संघटनेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक काम केलं, तसंच त्यांनी साहित्याच्या माध्यमातूनही केलं. त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक समजावून सांगण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी लेखनाचा मार्ग त्यांनी अवलंबला.
राज्यासह राज्याबाहेरील संस्थांनीही दाभोलकरांना गौरवलं. भारत सरकारनं डॉ. दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशननं पहिला समाजगौरव पुरस्कार अंधश्रद्धा निर्मुलन समितीला दिला होता.
अशा बऱ्याच पुरस्कारांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याचा गौरव झालाय.
Facebook/Milind Joshi
डॉ. दाभोलकरांनी 1998 पासून साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'साधना' मासिकाचं संपादनही केलं. साधनाच्या संपादकपदावर दाभोलकर शेवटपर्यंत कार्यरत होते.
व्यसनमुक्तीसाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले.
दाभोलकरांच्या या कर्तृत्त्वाचा आलेख संपता संपणार नाही. मात्र, एक खरं की, त्यांनी प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी विवेकवादी भूमिका ठेवली.
अखेर 'अंधश्रद्धा निर्मुलन कायदा' आला...नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने 2013 साली तडकाफडकी जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला.
या आधी हा कायदा पास व्हावा म्हणून दाभोलकरांनी 2010 पासून अनेक प्रयत्न केले होते. याच कायद्याचा मसुदा त्यांच्याच अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थेने तयार केला होता.
मात्र, कायदा प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संमत होण्याआधीच म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली.
Milind Joshi
उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हा कायदा 'हिंदू-विरोधी' आहे असं म्हणत याला विरोध केला होता. संसदेच्या सलग सात अधिवेशनांमध्ये यासंबंधी विधेयक मांडलं गेलं होतं, पण दाभोलकरांच्या मृत्यूआधी हा कायदा पास होऊ शकला नाही.
सध्या या कायद्यात 12 कलमं आहेत. यात मारहाण, छळ, जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला लावणं, भूत उतरवण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण करणं, चमत्कार घडवण्याचा दावा करणं, काळी जादू केल्याचा आरोप करणं, काळी जादू केली म्हणून एखाद्याला बहिष्कृत करणं, जादूने एखाद्याचा आजार बरा करण्याचा दावा करणं अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.
आज महाराष्ट्रात या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत काही प्रश्न असले, तरी या कायद्यान्वये अनेक जणांची अंधश्रद्धेच्या जाचातून सुटका झाल्याचीही उदाहरणं आहेत.
दाभोलकरांच्या हत्येपासून ते निकालापर्यंत, काय काय घडलं?अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 या दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली होती.
सुरुवातीच्या काही वर्षांत तर फक्त तपास वेगवेगळ्या दिशेनं भरकटतानाच दिसून आला. कधी तपासाचा छडा लागल्याचा दावा केला गेला, तर कधी आढळेले धाग्यादोऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं लक्षात आलं.
मात्र, तपास आणि न्यायालयीन पातळीवर आता काय सुरू आहे, तर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी एकूण पाच जणांवर आरोप निश्चिती झाली होती.
Facebook/Milind Joshi
15 सप्टेंबर 2021 रोजी पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नवंदर (यूपीए प्रकरणाचे विशेष न्यायाधीश) यांनी पाच जणांवर आरोप निश्चित केले. या पाच जणांमध्ये वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा समावेश आहे.
तावडे, अंदुरे, काळस्कर आणि भावे यांच्यावर न्यायालयाने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले.
पुनाळेकर विरोधात आयपीसी कलम 201 (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित केला आहे.
Facebook/Milind Joshi
कधी प्लँचेट, कधी छडा लागल्याचा दावा, कधी दाभोलकरांनंतर झालेल्या इतर हत्यांमधील सूत्र... अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तपास लांबत गेल्याचं दिसून आलं.
10 मे 2024 रोजी तब्बल 11 वर्षांनंतर 10 मे 2024 रोजी या प्रकरणाचा निकाल लागला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आलं.
विरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)