Getty Images प्रतिकात्मक फोटो
हरियाणातील रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात (एमडीयू) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महिला सफाई कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडचा फोटो काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे विद्यापीठात प्रचंड संताप आणि वाद निर्माण झाला आहे.
या प्रकरणी तीन महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून रोहतक येथील पीजीआयएमएस पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या आरोपांनंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ कारवाई करत दोन वरिष्ठ स्वच्छता पर्यवेक्षक आणि एका सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?महिला सफाई कर्मचाऱ्याने विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत लिहिलं आहे की, "ती गेल्या 11 वर्षांपासून विद्यापीठात सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहे.
26 ऑक्टोबरला रोजी ती आणि तिचे काही सहकारी रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात साफसफाईचं काम करत होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित दोन पुरुष पर्यवेक्षकांनी त्यांच्यावर लवकर काम संपवण्याचा दबाव आणला."
"यावर दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांनी आम्हाला मासिक पाळी आली आहे. त्यामुळे होणाऱ्या शारीरिक वेदनांमुळे काम वेगाने करता येत नसल्याचं सांगितलं."
MDU Rohtak महर्षी दयानंद विद्यापीठ (एमडीयू)
तक्रार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने लिहिलं की, "त्यावर पर्यवेक्षकाने आमच्याशी बोलताना असभ्य भाषा वापरली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मासिक पाळीची खात्री करण्यासाठी आमच्या सॅनिटरी पॅडचे फोटो काढण्याचा आदेश दिल्याचे सांगितले."
तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे की, स्वच्छता पर्यवेक्षकाने त्यांच्यासह आणखी दोन महिला सफाई कर्मचाऱ्यांवर सॅनिटरी पॅडचे फोटो काढण्यासाठी दबाव आणला.
"एका महिला कर्मचाऱ्याने फोटो काढण्यास नकार दिला, तेव्हा तिला शिवीगाळ करण्यात आली आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली."
दबाव आणि मजबुरीमुळे त्यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने वॉशरूममध्ये जाऊन आपल्या मोबाइलवर सॅनिटरी पॅडचे फोटो काढल्याचे तक्रारदारांनी सांगितलं.
पर्यवेक्षकाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात विद्यापीठातील एका सहायक कुलसचिवाचाही सहभाग होता, असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.
दुसऱ्या तक्रारदार महिला कामगाराचं म्हणणं काय आहे?माध्यमांशी बोलताना आणखी एका महिला सफाई कर्मचाऱ्याने सांगितलं की, "मी सकाळी साडेसात वाजल्यापासून सतत साफसफाईचं काम करत होते. पण दुपारी दोनच्या सुमारास मासिक पाळी सुरू झाल्याने मी पर्यवेक्षकाकडे काही तासांची रजा मागितली, ती मंजूर करण्यात आली."
"दरम्यान, माझ्या आणखी दोन सहकाऱ्यांनीही सांगितलं की, त्यांनाही मासिक पाळीमुळे त्रास होत आहे.
त्यामुळे मी पुन्हा पर्यवेक्षकाला फोन करून त्यांच्यासाठी काही तासांची रजा मागितली, पण पर्यवेक्षकाने चिडून उत्तर दिलं, 'सगळ्यांनाच एकदम त्रास कसा झाला?'"
Getty Images
"पर्यवेक्षकाने सोबत असलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याला सांगितलं की, ज्यांनी रजा मागितली आहे त्यांची तपासणी कर. त्याने असंही म्हटलं की वरून आदेश आला आहे, तपासणी करूनच जा."
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासोबत असलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याने बाथरूममध्ये जाऊन त्यांची तपासणी केली आणि मोबाइलवर सॅनिटरी पॅडचे फोटो काढले.
त्यानंतर तिने पर्यवेक्षकाकडे येऊन त्यांना मासिक पाळी आली असल्याचे सांगितले.
न्यायासाठी महिला कर्मचाऱ्यांचा लढापर्यवेक्षकाविरुद्ध तक्रार केलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्याने सांगितलं की, हा एका स्त्रीचा अपमान करणारा आणि लज्जास्पद प्रकार आहे.
"मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, प्रत्येक स्त्रीला ती येते. एकाच दिवशी इतर महिलांना पाळी येऊ शकते. आमच्याशी असं वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे," असं या तक्रारदार महिला कर्मचाऱ्याने म्हटलं.
BBC हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं काय आहे?
बीबीसीचे प्रतिनिधी मनोज ढाका यांनी एमडीयू प्रशासनाशी संपर्क साधला असता, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कृष्णकांत गुप्तांनी कुलगुरूंनी या घटनेचा निषेध केल्याचे सांगितले.
या प्रकरणात गैरवर्तनाचे आरोप असलेल्या दोन्ही पर्यवेक्षकांना आणि एका सहाय्यक प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.
विद्यापीठातील लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार समितीला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आयोगाची कठोर कारवाईची मागणीहरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी बीबीसीशी बोलताना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ स्वतःहून दखल घेतल्याचे सांगितले.
Getty Images
"एखाद्या स्त्रीकडून तिच्या मासिक पाळीचा पुरावा मागणं, यापेक्षा अपमानास्पद दुसरं काही असू शकत नाही," असं रेणू भाटिया म्हणाल्या.
"मी या घटनेचा तीव्र निषेध करते आणि दोषींवर कारवाईची मागणी करते," असं त्या म्हणाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी रोहतकच्या पोलीस अधीक्षकांकडून आणि विद्यापीठाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे.
पोलिसांनी दाखल केला गुन्हाबीबीसीचे प्रतिनिधी मनोज ढाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहतकचे पोलीस अधीक्षक सुरेंद्र सिंह भौरिया यांनी, या प्रकरणात रोहतक पीजीआयएमएस पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध (दोन पर्यवेक्षक आणि एक सहाय्यक प्राध्यापक) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि संबंधित कलमांनुसार आरोपींवर कारवाई करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)