वूमन्स टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. भारताला 2017 साली इंग्लंड विरुद्ध अंतिम फेरीत अवघ्या 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. भारताचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न थोडक्या धावांमुळे भंगलं होतं. मात्र आता भारताकडे पहिल्यांदाच हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे. भारतासमोर वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. या महाअंतिम सामन्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. भारत हा सामना जिंकून विश्व विजेता होण्यासाठी सज्ज आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होणार की नाही? अशी चिंता चाहत्यांना आहे. तसेच या महाअंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र राखीव दिवसाचेही काही नियम आहे.
टीम इंडियाने याच मैदानात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली होती. भारताने सेमी फायनलमध्ये कांगारुंवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तेव्हाही त्या सामन्यावर पावसाचं सावट होतं. मात्र पावसाने त्या सामन्यात विघ्न घातलं नाही. मात्र दक्षिण आफ्रिका-टीम इंडिया अंतिम सामन्यात पावसाची बॅटिंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हवमान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी (2 नोव्हेंबर) नवी मुंबईत पाऊस होऊ शकतो. मात्र पहाटे 4 ते 7 दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच संध्याकाळीही पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते.
एक्युवेदरनुसार, संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान सरी बरसू शकतात. त्यामुळे खेळात व्यत्यय येऊ शकतो. परिणामी सामना थांबवावा लागेल, ज्यामुळे ओव्हर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसामुळे मुख्य दिवशी अर्थात 2 नोव्हेंबरला सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्यासाठी किमान 20 ओव्हरचा खेळ व्हावा लागेल. मात्र पावसामुळे ओव्हर कमी करण्यात आल्या आणि त्यानंतरही सामना न झाल्यास 3 नोव्हेंबर अर्थात राखीव दिवशी खेळ होईल. विशेष म्हणजे राखीव दिवशी पूर्ण 50 षटकांचा खेळ होईल.
तसेच राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही तर काय? असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. हा महाअंतिम सामना 2 आणि 3 नोव्हेंबरमध्ये निकाली न निघाल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित केलं जाईल.