नाशिक: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित रणजी करंडक स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. शनिवारी (ता. १) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी नऊपासून सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी, शुक्रवारी (ता. ३१) दोन्ही संघांनी मैदानावर उपस्थित राहून कसून सराव केला.
महाराष्ट्र व सौराष्ट्र यांच्यात होणाऱ्या चारदिवसीय रणजी करंडक सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. शुक्रवारी दोन्ही संघांनी सकाळपासून साधारणतः तीन तास कसून सराव केला. महाराष्ट्र व सौराष्ट्र संघाचे सकाळी साडेनऊच्या दरम्यान मैदानावर आगमन झाले. दोन्ही संघांनी आधी थोडावेळ हिरवळीवर फुटबॉलचा आनंद घेतला.
जिल्हाधिकारी प्रसाद यांची मैदानास भेट, पाहणी सामन्यानिमित्त जिल्हाधिकारी व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदसिद्ध अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी मैदानास भेट दिली. शुक्रवारी (ता. ३१) दिलेल्या भेटीत सामन्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या वेळी त्यांनी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन सभागृह, दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी-सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल (विनोद) शहा, सहसचिव चंद्रशेखर दंदणे, सचिव समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी विक्रांत मते, संजय परिदा, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, हेतल पटेल, प्रवीण घुले, राजू आहेर, राघवेंद्र जोशी, निखिल टिपरी, बाळासाहेब मांडलिक, नितीन धात्रक आदी उपस्थित होते.
पावसाचे सावट कायम...
राज्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सामना प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवारी (ता. ३१) कडक ऊन पडले असल्याने मैदान कोरडे होण्यास मदत झाली; परंतु दुपारच्या वेळी व रात्री उशिरा रिमझिम पाऊस सुरू झाला होता. तसेच, काही वेळ ढगाळ वातावरण होते. सामन्यादरम्यानच्या चार दिवसांमध्ये पाऊस झाल्यास खेळ प्रभावित होऊ शकतो.
Pune Elections : पुणे जिल्हा निवडणूक, ६० हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण; १४ नगर परिषदांसाठी अंतिम मतदारयादी जाहीरशासकीय विश्रामगृह, त्र्यंबक रोडवरून प्रवेश
शनिवार (ता. १)पासून होत असलेला सामना पाहण्यासाठी मोफत सुविधा असेल. त्र्यंबक रोडवरील जिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य प्रवेशद्वार, तसेच शासकीय विश्रामगृहाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून क्रीडाप्रेमींना प्रवेश दिला जाईल. वाहनतळासाठी ईदगाह मैदानाची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत केवळ परदेशात उपलब्ध असलेल्या लॉन्सवर बसून सामना पाहण्याची सुविधा नाशिककरांनाही याठिकाणी उपलब्ध असेल.