मुरूड ग्रामपंचायतीत ग्रामसेवकच नाही!
उपसरपंचांचा राजीनामा, ग्रामस्थांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १ ः दापोली तालुक्यातील जगाच्या नकाशावर असणाऱ्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ मुरूड येथे ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवकच नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. या गैरव्यवस्थेबद्दल संतापलेल्या ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जात उपसरपंच सुरेश तुपे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजप तालुका सरचिटणीस व मुरूड ग्रामस्थ विवेक भावे यांनी सांगितले की, एप्रिल २०२५ मध्ये सरपंच सानिका नागवेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. त्यानंतर उपसरपंच सुरेश तुपे ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होते; मात्र, कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त नसल्याने ग्रामपंचायतीची सर्व प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे.
गावातील पाणीपुरवठा योजनेचा पंप नादुरुस्त झाल्याने अनेक दिवस पाणीपुरवठा बंद आहे. पंप दुरुस्तीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी ग्रामसेवकच नसल्याने काम अडकलं आहे. विकासकामांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद किंवा बांधकाम विभागाकडे पाठवायच्या पत्रव्यवहारासाठीही कोणी जबाबदार अधिकारी उपलब्ध नाही. ऐन दिवाळीत गाव पाण्यावाचून तहानले आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी ग्रामसेवक न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्रामसभा आणि मासिक सभांदरम्यान पंचायत समितीकडून तात्पुरते ग्रामसेवक पाठवले जातात; पण सभांचे इतिवृत्त वेळेवर लिहिले जात नसल्याने गोंधळ आणि गदारोळ निर्माण होतो. याच कारणास्तव ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाऊन उपसरपंचांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
---