आईनेच दहा वर्षांच्या मुलीला वृद्धाच्या तावडीत दिले, मुलीवर वृद्धाचे मद्य पाजून अत्याचार
Tv9 Marathi November 02, 2025 10:45 AM

तळोजात एका भयानक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नवीमुंबईला हादरा बसला आहे. लंडनमध्ये रहाणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाने नवीमुंबईतील आपल्या घरात एका दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या मुलीला या वृद्धाच्या तावडीत देण्याचे निदर्यी कृत्य चक्क तिच्या आईनेच केल्याचे उघडकीस आले आहे. केवळ अडीच लाख रुपये आणि महिनाभराचे रेशन भरुन देण्याचे आश्वासनावर या आईने मुलीचा असा सौदा केल्याचे उघडकीस आले आहे.

या ७० वर्षीय वृद्धाने या दहा वर्षाच्या मुलीला मद्य पाजून वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तळोजा पोलिस ठाण्यात गुरुवारी ( ३० ऑक्टोबर ) फारुक अल्लाउद्दीन शेख (७०) मूळच्या लंडन येथील नागरिकावर गुन्हा दाखल झाला आहे. तळोजा सेक्टर २० मधील एका इमारतीत हा गुन्हा घडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा आरोपी या मुलीवर अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणात नवीमुंबईत खारघर – कोपरा गावात रहाणारी नूरबी अन्सारी या महिलेनेच तिच्या दहा वर्षाच्या मुलीला केवळ पैशासाठी या अनोळखी पुरुषाकडे पाठवल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी ७० वर्षीय फारुख शेख हा तळोजा फेज- २ मधील एकता डेव्हलपर्स सेक्टर- २० मधील रूम ३० प्लॉट, २३ येथे रहात होता.त्याच्याकडे नूरबी अन्सारी हिने तिच्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीला दिवस रात्र पाठविले. या बदल्यात तिने फारुख शेख कडून अडीच लाख आणि महिन्याचे घरातील रेशन भरून घेण्याचा सौदा केला असल्याचे तपासात उघड झाले.

याबाबत नवी मुंबईतील अनैतिक मानवी वाहतूक पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या टीमने संबंधित ठिकाणी छापा मारला असता,मुलीला आणि आरोपी फारुख शेख सापडले. चौकशीत धोकादायक घटना समोर आली. पीडीत १० वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईनीचे तिला आरोपीकडून पैसे आणि रेशनच्या बदल्यात पाठविले असल्याचे उघडकीस आले.

ती रोज रात्री स्वतः मुलीला घेऊन जात असे आणि सकाळी तिला आणायला जात असे. आरोपी मुलीला मद्यपाजून तिच्यावर रात्रभर लैंगिक अत्याचार करत असल्याचेही समोर आले आहे.दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना कोर्टात हजर करून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने नवी मुंबई परिसरात संताप व्यक्त होत असून,आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.