पुण्यातील गँगवॉरने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुण्याच्या कोंढव्यात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडण्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर कोयत्यानेही वार केल्याचे उघड झाले आहे. मात्र भरदिवसा हत्या झालेला गणेश काळे नेमका कोण आहे? त्याचे आणि आंदेकर टोळीचे वैर नेमके काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोंढव्यात घडली घटनासमोर आलेल्या माहितीनुसार, मयत गणेश काळे याच्यावर कोंढवा परिसरात रिक्षात असताना गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार देखील करण्यात आले. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात ही घटना घडली आहे. शहरात झालेल्या आणखी एका खूनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोण आहे गणेश काळे?समोर आलेल्या माहितीनुसार, मयत गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. याच समीर काळेने वनराज आंदेकरच्या खूनात वापरलेली पिस्तूले मध्य प्रदेशातून आणली होती. समीर हा सध्या कारागृहात आहे. आता त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ होता, समीरने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवले होते. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्धाची किनार असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी सोमनाथ गायकवाड टोळीने वनराज यांचा गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केला होता, ज्यामध्ये समीर काळेचा संबंध होता आता याच समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आली आहे.
फॉरेन्सिक टीम दाखल, तपास सुरूघटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ़ राजकुमार शिंदे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीसांच्या सोबत फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरील पुरावे जमा करत आहे. तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या जागेवर सामान्य लोकांना जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.