न्यायव्यवस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहिले
esakal November 02, 2025 11:45 AM

न्यायालयीन सुविधा सक्षम होणार
उदय सामंत ः ‘ग्राहक तक्रार निवारण’च्या इमारतीचे नूतनीकरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ ः न्यायव्यवस्थेच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहिले आहे. वकिलांना आम्ही कधीच नाराज करत नाही. मंडणगडसारख्या छोट्या गावात आम्ही न्यायव्यवस्थेसाठी सुंदर अद्ययावत इमारत उभी केली. भविष्यात बार असोसिएशनच्या सर्व कामात माझे सहकार्य राहील, ती आमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरण कामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, ॲड. अशोक कदम, ॲड. माधव भाटवडेकर, ॲड. विजय साखळकर, ॲड. राजशेखर मलुष्टे, ॲड. शाल्मली अंबुलकर, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. निनाद शिंदे, ॲड. प्रफुल्ल साळवी आदी उपस्थित होते. या प्रसंगी अॅड. पाटणे यांनी नूतनीकरण उपक्रमाचे स्वागत करत कामकाज अधिक सुकर व जनहितमुखी होईल, असा विश्वास व्यक्त केला तसेच कोकण आयुक्त आणि एएलटीचे कॅम्प रत्नागिरीत झाला पाहिजे तसेच वकिलांच्या हॉलकरिता १५० खुर्च्यांची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली. या दोन्ही मागण्या मंत्री सामंत यांनी तत्काळ मंजूर केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.