भारतीय महिला क्रिकेट संघ आज इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. आयसीसी महिला विश्वचषकावर (ICC Women One day World Cup 2025) मोहोर लावण्यासाठी आज दक्षिण आफ्रिकेसोबत अटीतटीचा सामना रंगणार आहे. पण इथं पर्यंतचा महिला क्रिकेट संघाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कायम दुय्यम म्हणून हिणवल्या गेलेल्या महिला संघाने आज इतिहास घडवला तर त्यांच्या आतापर्यंतच्या एकूण संघर्षाची ही इतिश्री असेल. पुरुष संघाहून त्यांना दुय्यम मानल्या जाणार नाही.
भारतीय महिला संघाने मोठा पल्ला गाठला
भारतीय महिला संघाने क्रिकेट जगताता मोठा पल्ला गाठला. मोठा टप्पा पार केला. सुरुवातीला महिला खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागला. महिला क्रिकेट संघाविषयी अनास्था, उदासीनता होती. त्यांना मोठा निधीही देण्यात येत नव्हता. महिला क्रिकेट संघाच्या सुरुवातीच्या दिवसातील संघर्षगाथा आता समोर आली आहे. या महिलांना खेळाडूंना देशातच नाही तर परदेशातही जमिनीवर, फरशीवर झोपावे लागत होते. कमी पैशात तजवीज करावी लागत होती. प्लास्टिकच्या कपातून डाळभात खावा लागत होता. 20 खेळाडूंसाठी केवळ 4 टॉयलेटची सोय असायची. स्वतंत्र रुम असणे हे तर दिवास्वप्नच होतं.
अशा परिस्थितीतून वाटचाल करत आज महिला क्रिकेट संघाने बराच दूरचा प्रवास केला आहे. मोठा टप्पा पार केला आहे. हे अंतर कापणे नक्कीच सोपं नव्हतं. या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी महिला खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागला. भारतात क्रिकेटची क्रेझ असली तरी महिला क्रिकेटकडे प्रेक्षकांपासून प्रशासनापर्यंत सर्वांचीच उदासीनता होती. त्या काळाच्या संघर्षातून तर आता आयसीसी महिला विश्वचषकाचा मजबूत दावेदार, मजबूत संघापर्यंतची महिला क्रिकेट संघाचीही कामगिरी नक्कीच अभिमानस्पद आहे.
आज नवी मुंबईतील डीवाय पाटील मैदानावर भारतीय क्रिकेट महिला संघ विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत भिडणार आहे. शांता रंगास्वामी आणि नुतन गावस्कर यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रवासाची संघर्षगाथा समोर आणली. त्यावेळी महिला संघासाठी पैशांची फारशी तजवीज नसायची. प्रायोजक मिळायचा नाही. देशातच अशी स्थिती असताना परदेश दौरा तर दिवास्वप्नच असायचं. पण आम्ही पुढेच जाणार हे हिय्या महिला क्रिकेटर्सने मनाशी केला होता, असे नुतन गावस्कर यांनी अनुभवकथन केले. नावाजलेले खेळाडू सुनील गावस्कर यांच्या त्या भगिनी आहेत. तर 1973 मध्ये स्थापन केलेल्या भारतीय महिला क्रिकेट परिषदेच्या (WCAI) त्या सचिवही होत्या. त्यानी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विमानाच्या तिकिटं मिळवण्यासाठी दमछाक
परदेशात सामना खेळण्यासाठी जाणं हे महिला क्रिकेट संघासाठी दिव्यच असायचं. कारण तिकीट खरेदीपासून मारामार सुरू व्हायची. त्यासाठी प्रयोजक शोधावे लागायचे. एनआरआय खेळाडूंचे पालक त्यासाठी योगदान द्यायचे. मंदिरा बेदी यांनी महिला खेळाडूंसाठी विमानांची तिकीटं काढल्याचे आणि अनेकदा एअर इंडियाने या तिकीटांचा खर्च उचलल्याची आठवण नुतन गावस्कर यांनी सांगितली.