भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचण्याची नामी संधी भारतीय संघाकडे आहे. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारतीय संघात कोणत्या खेळाडूंची निवड होईल याबाबत पेच कायम आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे. असं असताना 1 नोव्हेंबरपासून रणजी ट्रॉफीचा तिसरा टप्प्याचे सामने सुरु झाले आहेत. देशांतर्गत रणजी स्पर्धेत काही खेळाडूंची कामगिरी पाहता निवड समितीपुढे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत.असाच खेळाडू आहे करूण नायर.. करूण नायरने दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकत टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. करूण नायरने कर्नाटककडून खेळताना केरळविरुद्ध शतक ठोकलं आहे.
करूण नायर इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात होता. जवळपास 8 वर्षांनी त्याची संघात निवड झाली होती. पण या मालिकेतील 8 डावात फक्त एकच अर्धशत ठोकलं होतं. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला डावलण्यात आलं होतं. यामुळे करूण नायरने नाराजी व्यक्त केली होती. इतकंच काय तर निवड समितीने इंग्लंड दौऱ्यात त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या असं सांगत त्याला डावललं होतं. पण पुन्हा एकदा करूण नायरने निवड समितीसमोर आव्हान निर्माण केलं आहे. या पर्वात त्याने सलग दुसरं शतक ठोकलं आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये करूण नायरने 26वं शतक ठोकलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने 142 धावा करत नाबाद तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने कृष्णन श्रीजितसोबत 123 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रविचंद्रन स्मरणसोबत 183 धावांची भागीदारी केली. कर्नाटकने पहिल्या दिवशी 3 गडी गमवून 319 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात गोवा विरुद्ध नाबाद 174 धावांची खेळी केली होती. आता केरळविरुद्ध शतकी खेळी करून निवड समितीसमोर पेच निर्माण केला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शुबमन गिलच्या नेतृत्वात एक दोन दिवसात संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून मायदेशी परतल्यानंतर सराव सुरू होईल.