दिल्लीनंतर आता इस्लामाबादमध्ये आत्मघातकी हल्ला, हायकोर्टाजवळ कारमध्ये स्फोट, मृतदेहांचा पडला खच
Tv9 Marathi November 12, 2025 07:45 AM

भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही आत्मघातकी हल्ला झाला आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटात 12 लोकांची मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हायकोर्टाजवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला, या घटनेनंतर घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्यायालयीन संकुलाबाहेर स्फोट

समोर आलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या सेक्टर जी-11 मधील न्यायालयीन संकुलाबाहेर दुपारी 12:15 वाजता हा शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. सुरुवातीला हा स्फोट एका कारला जोडलेल्या गॅस सिलिंडरमुळे झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता कारमध्ये असलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्याने हा स्फोट झाला आहे. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाल्याची आणि 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

खटनास्थळी मृतदेहांचा खच

द एक्सप्रेस ट्रिब्यूनने या स्फोटाबाबत माहिती देताना सांगितले की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता, कारण या स्फोटाचा आवाज तब्बल 6 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. या घटनेनंतर अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. स्फोटानंतर घटनास्थळी मृतदेह विखुरलेले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अधिराऱ्यांनी आणि स्थानिकांना जखमींना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

तपासाला सुरूवात

या स्फोटाची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर न्यायालयीन संकुल आणि आजूबाजूचे रस्ते तातडीने बंद केले. सध्या या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीन घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तान सरकारने अद्याप हा दहशतवादी हल्ला आहे की नाही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

या घटनेनंतर आता इस्लामाबादमधील न्यायालयीन संकुले आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाली आहे. पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.