राजधानी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी 6:52 च्या सुमारास शक्तीशाली स्फोट झाला. i20 कारमध्ये हा ब्लास्ट झाला. त्यानंतर मंगळवारी शेजारच्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटाने हादरली. इस्लामाबादमध्ये हा स्फोट होताच पाकिस्तानने लगेच भारतावर आरोप केला. आतापर्यंत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचा इतिहास आहे. पुराव्यानिशी ते सिद्ध देखील झालं आहे. पण अलीकडे पाकिस्तान कुठल्याही पुराव्याशिवाय सातत्याने असे आरोप करत आहे. महत्वाच म्हणजे इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटात भारताचा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शफीर यांनी केला. मंगळवारीच भारताने पाकिस्तानचा हा आरोप फेटाळून लावला.
भारताने पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ यांचे दावे तथ्यहीन, निराधार असल्याचं म्हटलं. “हडबडलेल्या पाकिस्तानी नेतृत्वाने केलेले आरोप निराधार आहेत. भारत स्पष्टपणे हे निराधार आरोप फेटाळून लावत आहे. ही एक चाल आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले.
पाकिस्तानात स्फोट कोणी घडवला?
इस्लामाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना शहबाज शरीफ यांनी हा आरोप केला. त्यानंतर काही वेळातच भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना आरोप फेटाळून लावला.पाकिस्तानला अस्थिर करण्याच्या उद्देशाने भारत इथे दहशतवाद पसरवतोय, असा आरोप शहबाज यांनी केला. तहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने इस्लामाबादमध्ये झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, तरीही पाकिस्तानी पंतप्रधानांनी या स्फोटासाठी भारताला जबाबदार ठरवलं.
शहबाज शरीफ यांनी आरोप करताना काय म्हटलं?
पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शरीफ यांनी पोस्ट केली. ‘भारताच्या समर्थनाने अफगाणिस्तानात ट्रेन झालेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला’. ‘भारताच्या संरक्षणात अफगाणिस्तानातून केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांची जितकी निंदा करावी तेवढी कमी आहे’ असं सुद्धा शहबाज शरीफ म्हणाले. पण पाकिस्तानी पंतप्रधानांना आपल्या आरोपांचे पुरावे देता आले नाहीत.
कॅडेट कॉलेज बाहेर सुद्धा हल्ला
शरीफ यांनी या घटनेला सोमवारी ख़ैबर पख्तूनख्वा येथे एका कॅडेट कॉलेज बाहेर झालेल्या हल्ल्याशी सुद्धा जोडलं. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी प्रतिबंधित TTP दहशतवादी संघटनेला जबाबदार धरलं होतं. दोन्ही हल्ल्यांमागे अफगाणिस्तानातून संचालित होणाऱ्या नेटवर्कचा हात आहे असं पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले.