दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटामध्ये (Delhi Blast) अनेक वाहनं जळून खाक झालं, 9 निरपराध लोकांनी जीव गमवाले, अनेकांच्या डोक्यावरचं छत्र उडालं आणि कित्येक लोकं जखमी होऊन रुग्णालयाच्या खाटेवर पडले आहेत. काहींची अद्याप मृत्यूशी झुंज सुरू आहे. अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या आत्मघातकी हल्ल्ल्याची पाळंमुळं शोधून काढण्यासाठी आणि जीवघेणा कट रचणाऱ्यांना शोधून कठोर शिक्षा देण्यासाठी सुरक्षा एजन्सी देशातील प्रत्येक कोपरा न् कोपरा पिंजून काढत आहेत. याप्रकरणात कालपासून नवनवी नाहिती, काही अपडेट्स येत असून डॉ. उमर याचे नावे प्रामुख्याने समोर आले आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला, त्यामध्ये डॉ. उमर आधी दिसला होता. स्फोटात तो ठार झाला की आणखी काही झालं याचाही कसून तपास करण्यात येत आहे.
दरम्यान दिल्लीतील जीवघेण्या स्फोटानंतर लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा नेता, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद चर्चेत आहे. स्फोटाच्या एक दिवस आधीच, लष्कर कमांडर सैफुल्लाहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.हाफिज सईद गप्प बसणार नाही असा दावा करताना सैफुल्लाहचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र असं असलं तरी दिल्ली स्फोटासंदर्भात जो तपास करण्यात येत आहे, त्यात अद्याप तरी लष्करचा कोणताही संबंध आढळलेला नाही.
लष्करने यापूर्वीही केले होते दहशतवादी हल्ले
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना 1987 साली पाकिस्तानमध्ये झाली. भारतात आतापर्यंत पाच मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप लष्करवर आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा यातील सर्वांत जीवघेणा आणि मोठा, सर्वात महत्त्वाचा आहे. 2008 मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईत ठिकठिकाणी हल्ले केले. यामध्ये एकूण 166 लोकं मारले गेले, तर 300 पेक्षा जास्त लोकं जखमी झाले.
लष्करवर जैश-ए-मोहम्मद आणि रेसिडेंट फ्रंट सारख्या दहशतवादी संघटनांशी सहकार्य करून दहशतवादी हल्ले केल्याचा आरोप आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलनुसार, सध्या लष्करमध्ये अंदाजे 5हजार दहशतवादी सक्रिय आहेत. लष्करच्या सर्व दहशतवाद्यांचे ट्रेनिंग हे पाकिस्तानमध्येच होतं.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात केलेल्याऑपरेशन सिंदूर या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने लष्कर-ए-तैयब्बाच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला. मुरीदके येथील लष्करचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या कारवाईत जैशनंतर लष्करचे सर्वाधिक नुकसान झाले. शेकडो दहशतवादी मारले गेले.
हाफिज सईद सध्या कुठे आहे ?
हाफिज सईद गप्प बसणार नाही असा दावा लष्कर कमांडर सैफुल्लाहने एका व्हिडिओमध्ये केला. यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, हाफिज सईद सध्या कुठे आहे? पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच 77 वर्षांचा हा दहशतवादी भूमिगत झाला आहे.
तर ऑपरेशन सिंदूरनंतर हाफिजचा मुलगा तल्हा याचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात त्याने म्हटले होते की, भारतीय सैन्य माझ्या वडिलांना मारण्यासाठी शोधत आहे, पण आम्ही त्यांना अशा सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे तकी जिथे कोणीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असा दावाच त्याने केला.
दरम्यान 30 जून रोजी हाफिज सईदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आजारी दिसत होता. काही दिवसांनी, माजी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एका मुलाखतीमध्ये सईदच्या लोकेशनबाबत एक वक्तव्य केलं. तो कदाचित अफगाणिस्तानमध्ये लपलेला असू शकतो असं ते म्हणाले. भारत जर त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सहकार्य करून, असंही ते म्हणाले.
तर याच वर्षी, 2 नोव्हेंबर रोजी हाफिज सईटने लाहोरमध्ये एका रॅलीचे आयोजन केले होते, पण ऐनवेळेस ती पोस्टपोन करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला, ज्यामध्ये आयोजक लवकरच हाफिजची रॅली आयोजित करण्याबद्दल बोलताना दिसत आहे. एकंदरीत, हाफिज सईद पुन्हा लाहोरभोवती सक्रिय असल्याचे दिसत आहे.