ऑस्ट्रेलिया दौरा संपून अनेक दिवस उलटले असले तरी भारताचे नावमंत खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या भविष्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. टेस्ट क्रिकेट आणि टी-20 इंटरनॅशनलमधून संन्यास घेतलेले हे दोन्ही दिग्गज खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसतात. त्यांना संघातून वगळण्यात आलंय, ते निवृत्ती घेणार, अशा अनेक अटकळी सुरू असतानाच विराट आणि रोहीत या दोघांनीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केलं, मात्र असं असलं तरीही त्यांचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. याचदरम्यान, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दोघांसमोर एक अट ठेवली आहे. जर ते देशांतर्गत क्रिकेट खेळले तरच त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळेल अशी अट घातल्याचे समजते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 मॅचच्या वनडे सीरिजमध्ये सहभागी झाल्यावर विराट आणि रोहित सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. त्याचं कारण म्हणजे टीम इंडियाने अलीकडेच एक टी-20 मालिका खेळली आणि आता भारतीय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण त्यानंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार असून, त्याआधी बीसीसीआयने विराट आणि रोहित या दोन्ही स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा फर्मान जारी केले आहे.
पूर्ण करावी लागेल ही अट
इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, भारतीय बोर्डाने दोन्ही माजी कर्णधारांना 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. त्यामुळे, ही अट 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेसाठी लागू होणार नाही. मात्र, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका 11 जानेवारी 2026 पासून न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्या मालिकेसाठी निवड व्हावी असं वाटत असेल तर विराट आणि रोहित दोघांनाही ही अट पूर्ण करावी लागू शकते. पण हे दोन्ही खेळाडू या टूर्नामेंटमध्ये सहभागी होतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल.
मात्र, या अहवालात असे म्हटले आहे की रोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनला त्याच्या मनसुब्यांची माहिती दिली आहे. तो केवळ विजय हजारे ट्रॉफीच नाही सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्येही खेळू शकतो, जी या सीरिडपूर्वीच होणार आहे. ही स्पर्धा 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 18 डिसेंबरपर्यंत चालेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निवडीसाठी या स्पर्धेत खेळणे देखील अनिवार्य केले जाईल की नाही हे तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे विराट कोहलीबद्दल सांगायचं झालं तर तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.