भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये येत्या 14 नोव्हेंबरपासून दोन मॅचची टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. सीरीजचा पहिला सामना 14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर आणखी एक टेस्ट सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण या सीरीजसाठी निवड झालेल्या गोलंदाजांनी कॅप्टन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढवलं आहे. याचं कारण आहे, खराब गोलंदाजी. त्यामुळेच इंडिया ए ला अलीकडेच दक्षिण आफ्रिका ए टीमकडून पराभवाचा सामना करावा लागलेला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये आकाश दीप, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आमि मोहम्मद सिराज यांची निवड करण्यात आली आहे. हे चारही गोलंदाज मोठ्या टीमची फलंदाजीची फळी मोडून काढण्यासाठी ओळखले जातात. पण अलीकडेच या चार पैकी तीन गोलंदाज दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अनधिकृत टेस्ट मॅच खेळले. हे तीन गोलंदाज आकाश दीप, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज आहेत. पण हे तिन्ही गोलंदाज दक्षिण आफ्रिका एविरुद्ध आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले.
हे भारतीय संघासाठी चिंता वाढवणारं
या अनऑफिशियल टेस्ट मॅचच्या दुसऱ्याडावात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 417 धावांच टार्गेट होतं. भारतीय कंडीशन्समध्ये चौथ्या डावात एवढं मोठं लक्ष्य पार करणं जवळपास अशक्यच आहे. पण या स्टार गोलंदाजांच्या लाइनअप समोर दक्षिण आफ्रिकेने फक्त पाच विकेट गमावून एवढ मोठं लक्ष्य पार केलं. आकाश दीप आणि कुलदीप यादव दोघांनी 5 च्या इकोनॉमीने धावा दिल्या. हे भारतीय संघासाठी चिंता वाढवणारं आहे. धावा रोखण्यात हे दोन्ही गोलंदाज अपयशी ठरले.
भारताची 15 वर्षांपासूनची बादशाहत धोक्यात
आकाश दीप या सीरीजद्वारे टीममध्ये पुनरागमन करत आहे. अनऑफिशियल टेस्ट मॅचमध्ये आकाश दीप महागडा गोलंदाज ठरला. त्याने 22 ओव्हरमध्ये 106 धावा देऊन फक्त एक विकेट काढला. सिराजने 17 ओव्हर्समध्ये 53 धावा देऊन एक विकेट काढला. कुलदीप यादव 17 ओव्हर्समध्ये 81 धावा देऊन एकही विकेट काढू शकला नाही. भारतीय गोलंदाजांच प्रदर्शन असच राहिलं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागच्या 15 वर्षांपासूनची बादशाहत धोक्यात येऊ शकते.
टेस्टमध्ये खूप खराब रेकॉर्ड
भारतात दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा टेस्टमध्ये खूप खराब रेकॉर्ड आहे. मागच्या 15 वर्षांपासून भारतात टेस्ट मॅच जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम तरसलीय. दक्षिण आफ्रिकेला भारतात टेस्ट मॅच जिंकण्यात शेवटचं यश 2010 साली मिळालं होतं. त्यावेळी नागपूरच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना झालेला.