MCA : जितेंद्र आव्हाड यांची एमसीएच्या उपाध्यपदी निवड, नवीन शेट्टी यांचा धुव्वा
GH News November 13, 2025 01:12 AM

एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजिंक्य नाईक यांची वर्णी लागली. इतर उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर बुधवारी 12 नोव्हेंबरला उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि इतर पदांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आता निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. आमदार आणि शरद पवार यांचे विश्वासू असलेले जितेंद्र आव्हाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पवार-शेलार पॅनलच्या आव्हाडांसमोर उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी यांचं आव्हान होतं. मात्र आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. तसेच सदस्यपदी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वर्णी लागली आहे.

सचिवपदी उमेश खानविलकर

एमसीएच्या सचिवपदी उमेश खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. खानविलकर यांनी शाहआलम शेख यांना पराभूत केलं आहे. सहसचिव पदी निलेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. भोसले यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केलं आहे. कोषाध्यक्ष म्हणून अरमान मलिक हे बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांनी सुरेंद्र शेवाळे यांचा पराभव केला आहे.

अजिंक्य नाईक यांनी पहिली प्रतिक्रिया काय?

अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वात एकूण 16 पैकी 12 उमेदवारांचा विजय झाला. या दणदणीत आणि एकतर्फी विजयानंतर अजिंक्य नाईक यांनी आनंद व्यक्त केला. तसेच या विजयाचं सर्वांना श्रेय दिलं.

हे आमच्या मैदानं, क्लब्स, सचिव आणि प्रत्येक महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या एकत्रित परिश्रमांची विजयगाथा असल्याचं अजिंक्य नाईक यांनी म्हटलं. “हा विजय संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा आहे. आपल्या शहराच्या क्रिकेट परंपरेचा अभिमान आहे”, असं एमसीएचे अध्यक्ष म्हणाले.

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचे आभार

अजिंक्य नाईक यांनी या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी शप गटाचे प्रमुख शरद पवार आणि आशिष शेलार यांचेही आभार मानले.

“माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या मजबूत पाठिंब्यामुळेच हा यशाचा प्रवास शक्य झाला. तसेच आशिष शेलार यांच्या सततच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे”, अशा शब्दात अजिंक्य नाईक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची एक्स पोस्ट

“क्रिकेटसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार”

तसेच उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी या पोस्टमधून मतदारांचे आणि या निवडणुकीत त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच एमसीएच्या माध्यमातून क्रिकेटच्या विकासासाठी चांगली कामगिरी करणार असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.