आयपीएल 2026 म्हणजेचं स्पर्धेचं 19वं पर्व… या स्पर्धेत जेतेपदासाठी सर्वच फ्रेंचायझी जोर लावणार यात काही शंका नाही. यंदा नवा विजेता मिळणार की एखाद्या फ्रेंचायझीच्या जेतेपदात भर पडणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे फ्रेंचायझी संघ बांधणीसाठी आतापासूनच फासे टाकत आहेत. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांची आदलाबदल करण्यासाठी फ्रेंचायझीने पावलं टाकली आहेत. आता फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत या ट्रेडबाबत अधिकृत घोषणा होईल. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने मुंबई इंडियन्सच्या सिक्रेट प्लानचा खुलासा केला आहे. आर अश्विनच्या मते, मुंबई इंडियन्स शार्दुल ठाकुरला लखनौ सुपर जायंट्सकडून ट्रेड करू शकते. त्यामुळे पुढच्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. मुंबई इंडियन्सला अष्टपैलू कामगिरी करेल अशा खेळाडूची गरज आहे. त्या दृष्टीने शार्दुल ठाकुरकडे पाहात आहे.
आर अश्विनने युट्यूब चॅनेल एश की बातवर सांगितलं की, ‘मला वाटत नाही की मुंबई इंडियन्स कोणालाही सोडणार आहे. त्यांना दीपक चहर, जो अनेकदा दुखापतींना बळी पडतो, त्याला संघात ठेवायचे आहे का? त्यांनी आधीच दीपकच्या जागी लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकूरची खरेदी केली आहे. ‘ आर अश्विनच्या या खुलाशानंतर की शार्दुल ठाकूर पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची शक्यता दाट आहे. मागच्या पर्वात दीपक चहरने मुंबई इंडियन्सकडून 14 सामने खेळले आणि 11 विकेट घेतल्या.
शार्दुल ठाकुरने अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करत आहे. आयपीएल स्पर्धेत 105 सामने खेळला असून 107 विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्सकडून आयपीएल स्पर्धेला सुरुवात केली होती. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स या संघांकडून खेळला आहे. जर मुंबई इंडियन्ससोबतची डील पक्की झाली तर मुंबईकडून पहिल्यांदाच आयपीएल खेळेल.