भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. पहिल्या सामन्याला 48 तासांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. या सामन्याच्या निमित्ताने कोलकातामधील क्रिकेट चाहत्यांची 6 वर्षांची प्रतिक्षा संपणार आहे. इडन गार्डन्समध्ये तब्बल 6 वर्षांनंतर कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानातील अखेरच्या कसोटी सामन्यात 2019 साली भारत विरुद्ध बांगलादेश आमनेसामने होते. इडन गार्डन्समध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तब्बल 15 वर्षांनंतर सामना होत आहे. भारतीय संघाने 15 वर्षांआधी सहज विजय मिळवला होता. मात्र आता भारतासाठी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणं आव्हानात्मक असणार आहे. भारतासमोर पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाचं आव्हान असणार आहे.
खेळपट्टी कुणाच्या बाजूने?पीच क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्यानुसार, इडन गार्डन्समधील फलंदाज आणि गोलंदाजांना फायदेशीर अशा खेळपट्टीवर हा सामना होणार आहे. सामन्यादरम्यान खेळपट्टीतून उसळीही मिळेल तसेच तिसऱ्या दिवशी बॉल टर्न करेल. तर त्याआधी फलंदाजांसाठी खेळपट्टी पोषक असेल. मात्र शेवटी शेवटी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे फलंदाजांच्या अनुभवाचा चांगलाच कस लागणार आहे.त्यामुळे टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेच्या 3 फिरकी गोलंदाजांचं आव्हान असणार आहे. हे 3 फिरकी गोलंदाज कोण आहेत आणि त्यांची गेल्या काही सामन्यांमधील कामगिरीचे आकडे आपण जाणून घेऊयात.
केशव महाराजहनुमान भक्त आणि भारतीय वंशाचा मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी खेळणारा केशव महाराज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. केशवने पाकिस्तान दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली होती. केशवने रावळपिंडी कसोटीत एकूण 9 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं होतं. केशवने 2024 पासून 7 कसोटी सामन्यांमध्ये 35 तर 2025 मध्ये आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 19 विकेट्स मिळवल्या आहेत. तर केशवने भारतात खेळलेल्या 2 कसोटींमध्ये 6 विकेट्स मिळवल्या.
इतर 2 फिरकीपटू कोण?सायमन हार्मर आणि सेन्युरन मुथुसामी हे दोघेही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकतात. मुथुसामीने 2019 साली टीम इंडिया विरुद्ध कसोटी डेब्यू केलं होतं. मात्र मुथुसामीला केशवच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. मुथुसामी 6 वर्षांत 7 सामने खेळला आहेत. मुथुसामीने 7 पैकी 4 सामने हे ऑक्टोबर 2024 ते आतपर्यंत खेळले आहेत. मुथुसामीने या दरम्यान 20 विकेट्स मिळवल्या आहेत. मुथुसामीने पाकिस्तान दौऱ्यात लाहोरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात प्रत्येकी 5 विकेट्स मिळवल्या होत्या. मुथुसामी एकूण 11 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला होता.
तसेच सायमन हार्मर याने 12 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र सायमनला फर्स्ट क्लास क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. सायमनने 236 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 1 हजार विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सायमनने 12 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 52 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच सायमनने पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत एकूण 13 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता टीम इंडिया या तिघांचा कसा सामना करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.