Getty Images अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (फाइल फोटो)
प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.
गोविंदाचे सहकारी आणि कायदेशीर सल्लागार (लिगल अॅडव्हायझर) ललित बिंदल यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
ललित यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, मंगळवारी (11 नोव्हेंबर) रात्री 8.30च्या सुमारास गोविंदा राहत्या घरात बेशुद्ध पडला.
सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषध देण्यात आलं. मात्र, नंतर त्याची प्रकृती आणखी ढासळली असता मंगळवारी मध्यरात्री (एकच्या सुमारास) जुहूतील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गोविंदाची प्रकृती आता स्थिर असल्याचं ललित यांनी सांगितलं.
ललित यांनीच गोविंदाला रुग्णालयात दाखल केलं होतं. सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या गोविंदा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून सर्व आवश्यक चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांच्या निकालाच्या आधारे डॉक्टर त्याच्यावर पुढील उपचार करतील, असंही ललित म्हणाले.
दरम्यान, गेल्या वर्षी पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाला याच क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हे रुग्णालय गोविंदाच्या जुहू येथील घरापासून अगदी जवळ आहे.
डॉक्टरांनी काय माहिती दिली?क्रिटी केअर रुग्णालयातील डॉक्टर दीपक नामजोशी यांनी गोविंदाच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
नामजोशी म्हणाले, गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
गोविंदाच्या वैद्यकीय चाचण्यांचे निकाल अद्याप आलेले नाहीत पण सध्या त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, परवा रात्री उशिरा गोविंदा स्वतः गाडी चालवून अभिनेता धर्मेंद्र यांना भेटायला ब्रीच कँडी रुग्णालयात गेला होता.
धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. या कालावधीत चित्रपटसृष्टीतील अनेकजण ब्रीच कँडीमध्ये धर्मेंद्र यांना भेटायला गेले होते. गोविंदा देखील ब्रीच कँडीमध्ये धर्मेंद्र यांना भेटायला गेला होता.
गोविंदाचे सेक्रेटरी शशी सिन्हा बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले की, काल दिवसभर घरी असताना गोविंदाला अस्वस्थ वाटत होतं आणि चक्कर येत होती.
त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्री उशिरा गोविंदाने विविध तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
गोविंदाची कारकिर्दगोविंदात्याच्या जबरदस्त नृत्यकला आणि हसतमुख व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. त्याचा अभिनय आणि शैली आजही चाहत्यांच्या मनावर छाप सोडते. आपल्या अभिनयाने आणि नृत्यकौशल्याने गोविंदाने 90 चा काळ गाजवलाय.
त्याचा कुली नंबर 1, हिरो नंबर 1, साजन चले ससुराल, हसीना मान जाएगी, हद करदी आपने, आंटी नंबर 1, जोडी नंबर 1, बडे मिया छोटे मिया आदी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. हे सर्व 90 च्या दशकातील हिट चित्रपट होते. गोविंदा त्या काळात बॉलीवूडचा हिट मशीन मानला जायचा.
Govinda/Facebook
गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गोविंदाने करिअरच्या सुरुवातीलाच सुनीताबरोबर लव्ह मॅरिज केलं.
मात्र, काहीकाळापर्यंत त्याने हे लग्न जगापुढे जाहीर केलं नव्हतं. कारण, करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्यांच्या लग्नाबाबत माहिती झाल्यास कदाचित त्यांची लोकप्रियता प्रभावित होऊ शकते, असं मानलं जायचं. मात्र, या गोष्टीचा गोविंदाच्या लोकप्रियतेवर फार काही परिणाम झाला नाही.
कॉमिक टायमिंगएक काळ असा होता की गोविंदाचे वर्षातून 8 ते 9 चित्रपट प्रदर्शित होत असत आणि बॉक्स ऑफिसवर गाजतही असत.
गोविंदाची अद्भुत कॉमिक टायमिंग, खास संवादशैली आणि त्याच्यासाठी लिहिलेल्या पंच लाईन्स, रंगीबेरंगी आणि चमकदार कपडे, अद्भुत नृत्यशैली हे सर्व बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी पुरेसे होते. याच दमावर त्याने 80-90 चा काळ गाजवला.
गोविंदा ना आमिर खानसारखा चॉकलेट हिरो होता, ना त्याची सलमानसारखी बॉडी होती, ना शाहरुखसारखी रोमँटिक इमेज होती, ना त्याच्याकडे अक्षय कुमारसारखी अॅक्शन होती. मात्र, गोविंदाचा स्वतःचा वेगळा लूक आणि वेगळा स्वॅग होता. आणि त्याने याच्याच बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली.
Bade Miyan Chote Miyan Movie
गोविंदाची कॉमिक टायमिंग इतकी शार्प होती की 1998 साली 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांना वाटलं होतं की गोविंदाने अमिताभ बच्चनलाही मागे टाकलं आहे.
गोविंदा त्याच्या चित्रपट सेटवर नेहमी उशिरा येण्याच्या कारणासाठीही प्रसिद्ध आहे. तो सेटवर कायम उशिरा यायचा आणि त्यामुळे अनेकदा दिग्दर्शकांना तासनतास त्याची वाट पाहावी लागायची. अनेक दिग्दर्शकांनी गोविंदाच्या या सवयींबद्दलची बाब विविध मुलाखतींमधून मांडली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.