IND vs SA : मोहम्मद शमीचा टीम इंडियातील मार्ग बंद? कर्णधार गिल प्लेइंग 11 बाबत काय म्हणाला?
GH News November 13, 2025 07:21 PM

India vs South Africa Test: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सहा वर्षानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डनवर कसोटी सामना होत असल्याने त्याचं महत्त्व वाढलं आहे. या मैदानात यापूर्वी 2019 मध्ये शेवटचा कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला होता. आता या मैदानात पुन्हा खेळण्याची जय्यत तयारी केली गेली आहे. या मैदानातील खेळपट्टीवरून क्रीडाप्रेमींच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांवर सर्व काही अवलंबून असणार आहे असं दिसत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. त्यामुळे आकाश दीपला संधी मिळेल की नाही? याबाबत शंका आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव चार फिरकी गोलंदाज असून कोणाला संधी मिळेल? याबाबतही उत्सुकता आहे. कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “हे नेहमीच असेच घडते. जर तुम्ही अतिरिक्त वेगवान गोलंदाज किंवा फिरकी गोलंदाजासह खेळलात तर नेहमीच संघर्ष असतो. म्हणून आम्ही उद्या परिस्थितीचे मूल्यांकन करू आणि अंतिम इलेव्हनवर निर्णय घेऊ.”

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड झाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण कोलकात्याचं ईडन गार्डन हे शमीचं होमग्राउंड आहे. इतकंच काय तर मोहम्मद शमीने देखील संघात निवड होत नसल्याने मध्यंतरी टीका केली होती. अशा वादाच्या पार्श्वभूमीवर कर्णधार शुबमन गिलने पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. शुबमन गिलने शांतपणे सांगितलं की, निवडीच्या मुद्द्यावर काहीच बोलू शकत नाही. गिलने स्पष्ट केलं की, ‘निवड समिती तुम्हाला याचं योग्य उत्तर देऊ शकतील.’ शुबमन गिलने सहा महिन्यांपूर्वीच कसोटी संघाची धुरा हाती घेतली आहे. त्यामुळे वादग्रस्त मुद्द्यावर फार काही बोलणार नाही किंवा त्यावर बोलणं टाळणार हे निश्चित आहे. यापूर्वी अनेक कर्णधारांना हीच रणनिती अवलंबली आहे.

मोहम्मद शमी 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. 2023 वनडे वर्ल्डकप अंतिम फेरीच्या दुखापतीनंतर भारतीय संघाबाहेर आहे. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला संधी मिळाली. पण नंतर काही संघात स्थान मिळालं नाही. शुबमन गिलने पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीची स्तुती केली. तसेच अनुभवी गोलंदाजासाठी ही कठीण काळ असेल हे देखील मान्य केलं. “त्याच्या क्षमतेचे गोलंदाज फारसे नाहीत.”, अशी जाहीर कबुली त्याने दिली. “पण आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा सारख्या सध्याच्या गोलंदाजांच्या कामगिरीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. कधीकधी शमी भाईसारख्या खेळाडूंना बाहेर बसणे कठीण होऊ शकते.” असं सांगत शुबमन गिलने वेळ मारून नेली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.