आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दहाही फ्रेंचायझी मोर्चेबांधणी करत आहे. आपल्या संघाची कमकुवत बाजू समजून घेत दुसऱ्या फ्रेंचायझीकडून खेळाडूंची आयात करत आहेत ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंच्या देवाणघेवाणीला अंतिम स्वरूप दिलं जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सर्वात मोठी डील सुरु आहे. मात्र त्याला अजून अंतिम मोहोर लागलेली नाही. असं असताना मुंबई इंडियन्सने सर्वात आधी बाजी मारली आहे. 2025 स्पर्धेतील संघाच्या त्रुटी लक्षात घेऊन मुंबई इंडियन्सने जबरदस्त फासा टाकला आहे. कारण होमग्राऊंडवर होणाऱ्या सात सामन्यांचं गणित बरोबर मुंबईच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे मैदानाची जाण असलेल्या अष्टपैलू खेळाडूची मुंबई इंडियन्सला गरज होती. त्या दृष्टीने मुंबईकर असलेल्या शार्दुल ठाकुरवर डोळा होता. त्यासाठी मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट्सकडे मागणी केली आणि त्यात यशही मिळवलं. अखेर त्या ट्रेड विंडोला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे. लखनौ सुपर जायंट्सचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
मुंबईकर अष्टपैलू शार्दुल ठाकुरची लखनौ सुपर जायंट्सने 18व्या लीगसाठी निवड केली होती. अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकुरला रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलं होतं. त्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने 2 कोटी रुपये मोजले होते. लखनौ सुपर जायंट्ससाठी 10 सामन्यांमध्ये खेळला होता. आता या अष्टपैलू खेळाडूला त्याच्या सध्याच्या मानधनात मुंबई इंडियन्सने घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने यासाठी लखनौ सुपर जायंट्सला 2 कोटी रुपये दिले आहेत. आयपीएल 2025 स्पर्धेत अचानक एन्ट्री झालेल्या शार्दुल ठाकुरने लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगली खेळी केली होती. त्याने 10 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या.
पंजाब किंग्सकडून आयपीएल करिअर सुरू केलं होतं. त्यानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स या संघांकडून खेळला. आता 2026 आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससोबत खेळताना दिसणार आहे. शार्दुल ठाकूरने 105 आयपीएल सामने खेळले असून 107 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुल ठाकुर संघात आल्याने जसप्रीत बुमराहला अनुभवी गोलंदाजाची साथ मिळणार आहे. तसेच मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्याची क्षमताही शार्दुल ठाकुरमध्ये आहे.