मुंबई इंडियन्सचं आयपीएल मेगा लिलाव 2025 वेळी सगळं गणित चुकल्याचं दिसून आलं. त्याचा फटका स्पर्धेत बसला. आता चुका दुरूस्त करण्यासाठी मुंबई इंडियन्सने बांधणी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सने मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन यशस्वी डील केल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडून अष्टपैलू शार्दुल ठाकुरची निवड केली आहे. कारण मुंबई इंडियन्सनचे साखळी फेरीतील सात सामने हे होमग्राउंडवर होतात. अशा स्थितीत शार्दुल ठाकुरची मदत होणार आहे. दुसरीकडे, आणखी एका अष्टपैलू खेळाडूला संघात घेण्यात यश मिळवलं आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शेरफेन रदरफोर्डची यशस्वी ट्रेड केली आहे. गुजरात टायटन्सला 2.6 कोटी देऊन त्याला संघात घेतलं आहे. रदरफोर्ड खालच्या फळीत फलंदाजीला उतरून सामन्याचं रूपडं पालटण्याची ताकद ठेवतो. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याने गुजरात टायटन्ससाठी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सची त्याच्यावर नजर होती.
आयपीएल मेगा लिलाव 2025 वेळी गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी 2.6 कोटी मोजले होते. तितकीच रक्कम मोजून मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतलं आहे. आयपीएल 2026 च्या आधी मुंबई इंडियन्सने दुसऱ्या संघातून ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेतलेला शेरफेन रदरफोर्ड हा दुसरा खेळाडू आहे. एकाच दिवसात मुंबई 4.6 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे पर्स रितं झालं आहे. त्यामुळे15 नोव्हेंबरला कोणत्या खेळाडूंना रिलीज करणार याची उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्स दीपक चहरला रिलीज करण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने मेगा लिलाव स्पर्धेत 9.25 कोटी मोजले होते. आता तसंच घडतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रदरफोर्डने आतापर्यंत 23 आयपीएल सामने खेळले आहेत, यापूर्वी 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला होता. 2020 मध्ये एमआय संघाचा भाग होता. त्यानंतर 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग झाला. पण त्या वर्षी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. 27 वर्षीय रदरफोर्डने वेस्ट इंडिजसाठी 44 टी20 सामने खेळले आहेत. टी20 सामन्यांमध्ये सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंद्रे रसेलसोबत 139 धावांची भागीदारी केली होती.