तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती काय आहे, यावरून ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज वर्तवला जातो. मात्र कुंडलीमध्ये असे देखील काही ग्रह असतात, जे प्रचंड आक्रमक असतात, यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात. अशा समस्या निर्माण होऊ नये, यासाठी या ग्रहांना शांत करणं गरजेचं असतं. ज्योतिषशास्त्राचाच एक भाग असलेल्या वास्तुशास्त्रामध्ये यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एक उपाय आहे, तो म्हणजे तुरटीचा. तुरटीलाच काही ठिकाणी फिटकरी असं देखील म्हटलं जातं, तुरटी ही पांढऱ्या कलरची असते, तिचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. सर्व सामान्यपणे पाणी स्वच्छ करण्यासाठी आणि गाळ भांड्याच्या तळाशी बसवण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तसेच कुठे रक्त निघाले असेल तर रक्त गोठवण्यासाठी देखील तुरटीचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. आज आपण तुरटीचा वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून उपयोग जाणून घेणार आहोत.
तुरटीचा संबंध हा राहु ग्रहाशी आहे, जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये राहु ग्रह असतो, तेव्हा तुम्हाला अनेक अडचणी येतात, त्यामुळे राहु ग्रहाला शांत करण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. कुंडलीमधील राहु ग्रहाला शांत करण्यासाठी तुरटीच्या खड्याची पूड करा, तिला एका कापडामध्ये बांधा ही पूड गंगेच्या पाण्यात धुवून घ्या, आणि नंतर ज्या कापडामध्ये ही तुरटीची पूड बांधली आहे, ते कापड तुरटीसह तुमच्या देवघरात ठेवा. यामुळे राहु ग्रह शांत होईल आणि येणाऱ्या अडचणी दूर होतील. वास्तुशास्त्रामध्ये आणखी एक उपाय या संदर्भात सांगण्यात आला आहे, तुरटीची पूड तयार करा, तिच्यावर राहु मंत्राने अभिषेक करा आणि ही पूड तुमच्या घराच्या दरवाजाच्या वर बांधून ठेवा.
जर तुम्हाला वारंवार व्यवसायामध्ये तोटा होत असेल, व्यवसाय मनाप्रमाणे चालत नसेल. अपेक्षित नफा मिळत नसेल, अडचणी येत असेल तर तुम्ही तुरटीचा सोपा उपाय करू शकता, एका काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुरटी बांधून तुम्ही ती तुमच्या ऑफिसच्या किंवा दुकानाच्या वरच्या बाजूला बांधून ठेवा, यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)