- rat१३p५.jpg-
२५O०४१३७
संगमेश्वर ः तालुक्यातील कोसुंब येथे मार्गदर्शन करताना भाजप नेते प्रशांत यादव.
---
कार्यकर्त्यांचा सन्मानच आमची खरी ताकद
प्रशांत यादव ः शतप्रतिशत भाजपचा आदेश आला तर तयार रहा, कोसुंब गटात बैठक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे यासाठी आम्ही चर्चा करत आहोत. लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल. जर शतप्रतिशत भाजपचा आदेश आला तरीही आपली तयारी असली पाहिजे; पण ज्या वेळी उमेदवारी दिली जाईल त्या वेळी सर्वांनी एकदिलाने, पूर्ण ताकदीनिशी त्या उमेदवारांच्या पाठी उभे राहायचे आहे, असे प्रतिपादन भाजप नेते प्रशांत यादव यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गट व साडवली जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. कोसुंब गटातील ताम्हाणे येथे पहिली बैठक पार पडली तर साडवली गटात हातीव येथे बैठकीचे रूपांतर चक्क मेळाव्यात झाले. या वेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमोद अधटराव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित केतकर, भाजप मंडळ अध्यक्ष रूपेश कदम, रूपाली कदम, हातीव सरपंच नांदुभाई कदम, भाजप अनुसूचित मोर्चा अध्यक्ष प्रकाश जाधव, हातीव गावचे मानकरी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी यादव म्हणाले, मी पूर्ण विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माझ्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली, अहोरात्र काम करून एक संघर्षमय लढा उभारला त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता आपल्या बरोबर पुढे घेऊन जायचे असेल आणि भविष्यात त्यांना न्याय द्यायचा असेल तर भाजप हाच योग्य पक्ष आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्याच पद्धतीने आता कार्यकर्त्यांच्या पाठी ठाम उभा राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
चौकट
भाजपकडून जिल्हा परिषदेची तयारी
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असून, महायुतीमधील जागावाटप अजूनही झालेले नाही. त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. या निवडणुका झाल्यानंतर पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागणार असल्याने भाजपकडून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात बैठकांना जोर आला आहे.