Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती
esakal November 14, 2025 01:45 PM

Delhi Red Fort blast: दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या भीषण स्फोटाबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. स्फोट घडवून आणलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या भीतीपोटी घाईगडबडीत स्फोट केला, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे हा स्फोट पूर्ण क्षमतेने झाला नाही, असंही 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली-एनसीआर आणि पुलवामा या भागांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती. या कारवाईमुळे संशयितांवर दडपण वाढल्याने त्यांनी घाईघाईत स्फोट केला, अशी माहिती येतेय. हा हल्ला आत्मघाती नव्हता हे आता स्पष्ट होत आहे.

प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की, हा आत्मघाती हल्ला नव्हता. संशयिताने दबावाखाली येऊन घाबरून स्फोट घडवला. स्फोटासाठी वापरलेला बॉम्ब (IED) अविकसित होता आणि तो पूर्णपणे तयार झालेला नव्हता, ज्यामुळे स्फोटाची तीव्रता मर्यादित राहिली.

विशेष बाब म्हणजे, स्फोट झाला त्यावेळी कार धावत्या स्थितीमध्ये होती. त्यामुळे स्फोटामुळे घटनास्थळी कोणताही खड्डा पडलेला नाही किंवा स्फोटात धातूचे तुकडे आढळून आलेले नाहीत. सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली-एनसीआर आणि पुलवामासह अनेक ठिकाणी केलेल्या संयुक्त छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती. या वाढत्या दबावामुळेच संशयिताने घाबरून तातडीने स्फोट घडवला, अशी सूत्रांची माहिती आहे.

देशभरातील सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या धाडसत्रामुळे आणि दहशतवादी मॉड्यूल्सवर करण्यात आलेल्या कारवायांमुळे एक मोठा हल्ला टळला आहे, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे. हा आत्मघातकी हल्ला नव्हता, असं तपासामधून पुढे येतंय. याबाबत लवकरच अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.