Kolhapur Election: भाजपचा स्वबळाचा नारा बुलंद! कोल्हापूरच्या दहा नगरपरिषदांसाठी मोठे निर्णय
esakal November 14, 2025 03:45 PM

कोल्हापूर: जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायती निवडणुकांसाठी आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक येथील पक्ष कार्यालयात झाली. यावेळी आजरा नगरपंचायत, चंदगड, मुरगूड, कुरुंदवाड या नगर परिषदा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

जिल्ह्यातील काही नगर परिषदांबाबत अद्याप भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आज याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार महाडिक यांनी सर्वांची मते जाणून घेतली. ही बैठक दुपारी एक ते संध्याकाळी पाच अशी चार तास झाली. प्रत्येक नगर परिषदेतील प्रमुख पदाधिकारी आणि माजी सदस्य यांचीस्वतंत्र बैठक घेण्यात आली.

त्यानंतर याबाबतचा निर्णय करण्यात आला. यामध्ये चंदगड, मुरगूड, कुरुंदवाड या नगर परिषदा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आजरा नगरपंचायतही स्वतंत्र लढण्याचे निश्चित करण्यात आले.

Nagpur Election: निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये उफाळली गटबाजी; स्थानिक नेत्यांची प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली

कागलमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) बरोबर युती करण्यात येणार आहे, तर गडहिंग्लजमध्ये जनसुराज्य आणि स्वाती कोरी यांच्या जनता दलाबरोबर भाजप युती करणार आहे. पन्हाळा आणि मलकापूर या नगर परिषदांसाठी जनसुराज्य पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे.

अन्य नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. लवकरच त्यांच्या बाबतचाही निर्णय घेतला जाईल. बैठकीला जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

येथे स्वतंत्र लढणार

आजरा, चंदगड, मुरगूड, कुरुंदवाड

नगराध्यक्षपदाचे सात उमेदवार देणार

जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपचे उमेदवार लढवणार असल्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले.

विनय कोरे यांच्याशी चर्चा

या बैठकीदरम्यान आलेल्या आमदार विनय कोरे यांच्याशी चंद्रकांत पाटील, महाडिक यांनी पन्हाळा, मलकापूर आणि हातकणंगले नगरपरिषदेबाबत चर्चा केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.