Satara Accident: उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली, एक ठार, एक जखमी
esakal November 14, 2025 03:45 PM

विंग : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ट्राॅलीखाली सापडून एक जण जागीच ठार झाला. अन्य एक जखमी झाला. हिंदुराव तातोबा पाटील (वय ७५, सध्या रा. आगाशिवनगर- मलकापूर) असे अपघातातील मृताचे नाव असून, ते सेवानिवृत्त शिक्षक होते. विंग-धोंडेवाडी रस्त्यावर चारच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरील व पोलिसांची माहिती अशी, मृत हिंदुराव पाटील हे मित्रासमवेत दुचाकीवरून (एमएच ५० जी ९१३३) नातेवाइकाला भेटण्यासाठी विंग-धोंडेवाडी मार्गाने चालले होते.समोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला (एमएच ५० सी २१७८ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीवर पाठीमागे बसलेले हिंदुराव पाटील ट्राॅलीखाली सापडले.

त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले. दुचाकीस्वार आनंदा कांबळे त्यात जखमी झाले. त्यांच्यावर कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धनंजय पाटील व सहाय्यक फौजदार विठ्ठल खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कऱ्हाडला पाठवण्यात आला. चालकावर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत पाटील हे मूळचे काढणे (ता. पाटण) असून, अनेक वर्षांपासून ते आगाशिवनगर येथे स्थायिक आहेत.

Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले सुरक्षित अंतर ठेवा

प्रतिवर्षी ऊस हंगामात विंग-धोंडेवाडीमार्गे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात. दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनधारकांची फसगत हाेऊन अपघात घडतात. सुरक्षित अंतर ठेवूनच वाहने चालवण्याची गरज असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांत होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.