BAIF COP30 Summit : जागतिक हवामान परिषदेत 'बायफ'चा सहभाग, ब्राझीलमध्ये २१ नोव्हेंबरपर्यंत परिषद
esakal November 14, 2025 03:45 PM

पुणे : ब्राझीलमधील बेलेम शहरात सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेत (COP३०)भारतातील ‘बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’ सहभागी होत आहे. या जागतिक परिषदेत ‘बायफ’ ग्लोबल साउथसाठी हवामान वित्तपुरवठा, एकात्मिक जल व अन्न व्यवस्थापन आणि नवीन रोजगार आधारित हवामान कृती या मुद्द्यांवर विशेष भर देणार आहे.

ब्राझीलमध्ये २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या ‘कॉप-३०’मध्ये ‘बायफ’चे शिष्टमंडळ सर्वसमावेशक तंत्रज्ञान प्रवेश, क्षमता बांधणी, हवामान वित्तपुरवठ्यामधील तफावत भरून काढणे आणि पॅरिस करार तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भर देणार आहे.

Narayangaon Crime : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी जीएमआरटी प्रकल्पातील कंत्राटी कामगारासह दोन जणांना अटक!

याबाबत ‘बायफ’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. भरत काकडे म्हणाले, ‘‘जागतिक स्तरावरील हवामान धोरणांना स्थानिक स्तरावर प्रभावीपणे राबविणे, नावीन्यपूर्ण हवामान कार्यक्रम, हवामान वित्त पुरवठा आणि सर्व समावेशक उद्योजकता याबरोबरच पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम करणारे विस्तारक्षम कार्यक्रम प्रदर्शित करण्याचा आमचा उद्देश आहे.’’ दरम्यान, ‘बायफ’ ही संस्था सहा दशकांपासून भारतातील ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी कार्यरत असून जागतिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन क्लायमेट चेंज आणि संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद या संस्थांशी मान्यताप्राप्त निरिक्षक व नागरी संस्था म्हणून संलग्नित आहे.

त्याचबरोबर ‘बायफ’चे काम देशातील १७ राज्यात सुरू असून, ग्रामीण भागातील सुमारे ४० लाख कुटुंबांसाठी विकासाचे विविध उपक्रम राबविले आहेत. ‘कॉप-३०’ च्या माध्यमातून बायफचे शाश्वत विकासाचे कार्य जागतिक स्तरावर पोहोचविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.