PMC News : शिक्षक देण्यात महापालिका 'नापास', समाविष्ट गावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान
esakal November 14, 2025 05:45 PM

अभिजित कुचेकर

पुणे/उंड्री : नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील ६४ शाळांमध्ये शिक्षक देण्यास पुणे महापालिका असमर्थ ठरत आहे. भरती प्रक्रिया राबवूनदेखील शिक्षकांची कमतरता भासत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावरून शिक्षण विभागालाच शिक्षणाचे महत्त्व नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

२३ गावांच्या समावेशानंतर येथील शाळांचा कारभार महापालिकेकडे हस्तांतरित होऊन दोन वर्षे लोटली; मात्र अद्याप शाळांमध्ये आवश्यक संख्येपेक्षा कमी शिक्षक कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरावेळी महापालिकेने आपल्याकडील अतिरिक्त शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे दाखवत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या समायोजनाला विरोध दर्शविला होता. त्यानुसार या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची बदली होणे अपेक्षित होते. परंतु महापालिकेने अतिरिक्त शिक्षकांची बदली केली नसल्याने अजूनही या शाळा अपुऱ्या शिक्षकांवर सुरू आहेत. येथील शिक्षक एका वेळेस दोन वर्गांना शिकवत असतानाच महापालिकेतील अतिरिक्त शिक्षक काम न करण्याचा पगार घेत आहेत. पटसंख्येअभावी शहरातील शाळांचे एकीकरण करावे लागले आहे. समाविष्ट गावांत पटसंख्या असूनदेखील शिक्षक देता आलेले नाहीत, याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे.

भरती केलेले शिक्षक आहेत कुठे?

मागील चार महिन्यांपूर्वी कंत्राटी भरती करून आयुक्तांनी शिक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे राबवण्यात शिक्षण विभागाला अपयश आले आहे. जुलै २०२५ मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. मराठी माध्यमासाठी १९१, इंग्रजी माध्यमासाठी ६३ आणि विशेष मुलांच्या शाळांसाठी ३ अशा एकूण २५७ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली. तरीही काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे.

Viral Video Sangli Crime : ब्रेकिंग! सांगलीत भरदिवसा पोलिसांसमोर गोळीबार करण्याचा प्रयत्न; कलगुटकी खून प्रकरणातील सूत्रधारांना शूट करणार तेवढ्यात...

विद्यार्थी संख्या

  • मराठी - ७५ हजार

  • इंग्रजी, कन्नड, उर्दू - २५ हजार

शिक्षण विभागाचा पगार व अन्य महसुली खर्च (रुपयांत) - ९१४ कोटी या गावांमध्ये शिक्षकांची कमतरता

मांजरी, फुरसुंगी, बावधन, म्हाळुंगे, सूस, लोहगाव, किरकटवाडी, खडकवासला, उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, निंबाळकरवाडी, येवलेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव, कोंढवे-धावडे, शिवणे आणि मांगडेवाडीतील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३९ रिक्तपदे भरून समाविष्ट गावांतील शाळांना आवश्यक शिक्षक लवकर मिळतील, या दृष्टीने काम सुरू आहे.

- वसुंधरा बारवे, उपायुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग, महापालिका

असा होतो शिक्षणावर खर्च
  • शैक्षणिक साहित्य व भांडवली खर्च - ८६ कोटी

  • इमारत देखभाल-दुरुस्ती खर्च - १० कोटी

अतिरिक्त शिक्षकांची बदली आवश्यक

एखाद्या शाळेत नियमानुसार आवश्यक संख्येपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असल्यास त्यांना ‘अतिरिक्त शिक्षक’ मानले जाते. अशा शिक्षकांची बदली कमी शिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये करणे आवश्यक असते. काही शाळांमध्ये वर्गच उपलब्ध नसल्याने या शिक्षकांकडे शिकवण्यासाठी काम उरत नाही. त्यामुळे नियमानुसार अशा अतिरिक्त शिक्षकांना पगार देण्यात अडचणी येतात.

शहराबाहेरील शाळांकडे पाठ

भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शहरापासून दूर असलेल्या शाळांमध्ये जाण्यास शिक्षक इच्छुक नाहीत, असे आढळून आले आहे. अनेक शिक्षकांनी अशा शाळांमध्ये नियुक्ती टाळली असून, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी शहरातील शाळांना पसंती दर्शवली आहे.

महापालिकेच्या एकूण शाळा
  • मराठी माध्यमाच्या - २३४

  • कन्नड माध्यमाच्या - २

  • उर्दू माध्यमाच्या - ३१

  • इंग्रजी माध्यमाच्या - ४६

  • समाविष्ट गावांतील महापालिका शाळा - ६४

  • पटसंख्या - १६ हजार ३८३

  • कार्यरत शिक्षक - ४५०

  • रिक्त शिक्षक पदे - ३९

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.