Parbhani Accident: विवाहसोहळ्यास जाताना दुर्दैवी अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
esakal November 14, 2025 05:45 PM

पालम (जि. परभणी) : ट्रकच्या धडकेत दुचाकी चालक ठार झाल्याची घटना पेठशिवणी (ता. पालम) येथे गुरुवारी (ता. १३) सकाळी घडली. आंबेगाव ( ता.अर्धापूर, जि. नांदेड) येथील विश्वनाथ माधवराव मुदखेडे (वय ३७) व विद्या विश्वनाथ मुदखेडे (३४) हे दांपत्य मरडसगाव (ता. गंगाखेड) येथे विवाह सोहळ्यासाठी स्कूटीने निघाले होते.

पेठशिवणी परिसरात पोहोचताच अचानक भरधाव ट्रकने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की स्कूटीचे मोठे नुकसान झाले आणि विश्वनाथ मुदखेडे हे घटनास्थळीच ठार झाले.

त्यांच्या पत्नी विद्या यांना गंभीर दुखापत झाली असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने पेठशिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचार सुरू आहेत.

Nagpur Accident : ट्रकच्या धडकेत दोन मित्रांचा मृत्यू; एक अभियंता तर दुसरा आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला

घटनेनंतर ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले. पालम पोलिसांनी त्वरित पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून ट्रकचा माग काढण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. उपनिरीक्षक संडकर पुढील तपास करीत आहेत. या दुर्घटनेने परिसरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.