बाजाराच्या घसरणीतही संरक्षण कंपनीच्या शेअर्सची उसळी, सरकारकडून मिळाली 2100 कोटी रुपयांची ऑर्डर
ET Marathi November 14, 2025 06:45 PM
मुंबई : देशातील शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण आहे. मात्र, या घसरणीतही सरकारी मालकीची संरक्षण कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या शेअर्सने उसळी घेतली. Bharat Dynamics Limited शेअर्स ७.२% वाढून १,६२८.६० रुपयांवर पोहोचला. शेअर्सच्या या उसळीमागे मोठे कारण आहे.

२,०९५.७० कोटींचा करार

Bharat Dynamics Limited ला भारत सरकारकडून मोठी संरक्षण आॅर्डर मिळाली आहे. याशिवाय कंपनीने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली. यामुळे शेअर्स तेजीत आले आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून भारत डायनॅमिक्स लिमिटेडला २,०९५.७० कोटींचा करार मिळाला आहे. या करारांमध्ये कंपनी भारतीय सैन्याला इनवार अँटी-टँक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करेल. कंपनीच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केले जाईल.

नफ्यात ७६.२% वाढ

कंपनीला सप्टेंबर तिमाहीत २१६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील १२३ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. म्हणजे नफ्यात ७६.२% वाढ झाली आहे. तसेच तिमाहीत भारत डायनॅमिक्सचा महसूल दुप्पट होऊन १,१४७ कोटी रुपये झाला. महसूलात ११०.६% वाढ झाली. कंपनीचा EBITDA ९०% वाढून १८८ कोटी रुपये झाला. या कालावधीत EBITDA मार्जिन १७० बेसिस पॉइंट्सने घसरून १६.४% झाला.

शेअर्सचा परतावा

भारत डायनॅमिक्सच्या शेअर्सने गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना ६३.७१% चा मोठा परतावा दिला आहे. या वर्षी या शेअर्समध्ये ४२.९३% वाढ झाली. तर गेल्या तीन महिन्यांत २.७५% आणि एका महिन्यात ८.८% वाढ नोंदवली आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.