राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतराला देखील वेग आला आहे, दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे.
नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाझे यांचे सख्खे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, विशेष म्हणजे हेमंत वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार होते, आता भाजपाने शिवसेना ठाकरे गटाचा थेट नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवारच गळाला लावल्यानं हा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हेमंत वाजे हे यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ते गटनेता आणि उपनगराध्यक्ष देखील होते, तर त्यांच्या आई रुक्मिणी वाजे या आमदार होत्या, वडील देखील नगराध्यक्ष होते. हेमंत वाजे यांना गळाला लावत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी खेळी खेळली आहे. भाजपाच्या या खेळीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे थेट नगराध्यक्ष पदासाठी हेमंत वाजे यांच्या इतका तुल्यबळ दुसरा उमेदवार नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि पर्यायाने माणिकराव कोकाटे यांची आता या मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यात आहे. त्यामुळे आता भाजपकडून हेमंत वाजे यांनाच नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.