गरजेसाठी, निकड पडली तर आजकाल कर्ज काढले जाते. पूर्वीसारखं कर्ज काढणे हे कमी प्रतिष्ठेचं मानलं जात नाही. अनेक कामांसाठी कर्ज घेतले जाते. काही लोक घर खरेदीसाठी गृहकर्ज घेतात. काही जण पसंतीची कार खरेदीसाठी वाहन कर्ज घेतात. तर काही जण वैयक्तिक कारणासाठी कर्ज घेतात. पण जर कर्ज घेणाऱ्याचाच मृत्यू ओढावला तर मग बँका हे कर्ज माफ करतात का? बँका हे कर्ज विसरतात की वसूल करतात? अर्थात प्रत्येक कर्जाचे नियम वेगळे आहेत आणि त्याचा तसा फटका पण बसतो आणि फायदाही होतो.
गृहकर्जाची वसूली कशी करतात बँका?
जर गृहकर्ज असेल आणि अचानक कर्जदाराचा मृत्यू झाला तर, बँक सहकर्जदार, हमीदाराशी संपर्क करते. जर या दोघांनी हात वर केले तर अशा परिस्थितीत बँका मग त्या व्यक्तीची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करते. पण ही प्रक्रिया लागलीच करण्यात येत नाही. कर्जदाराच्या कुटुंबियांना नोटीस पाठवून आणि त्यांना कर्ज फेडण्यासाठी सूचना केल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्यास ही कार्यवाही होते. जर संपत्तीवर विमा घेतला असेल तर मात्र मग गृहकर्जाची चिंता करण्याची गरज नसते.
वाहन कर्ज कसं फेडणार?
वाहन कर्ज हे एक सुरक्षित कर्ज असते. अशात कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्य ओढावल्यास बँक कुटुंबियांशी संपर्क साधते आणि कर्ज फेडण्याची सूचना करते. जर उर्वरीत रक्कम मिळाली नाही तर मग वाहन जप्त करण्यात येते आणि त्याला लिलाव करण्यात येतो. त्यातूनही फरकाची रक्कम राहत असेल तर बँका संबंधित कुटुंबाकडे त्याची मागणी करतात. वाहन कर्ज अधिक असेल तेव्हा अशी अडचण येते.
वैयक्तिक कर्जाची वसुली
वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज श्रेणीत येते. अशा कर्जात बँकेकडे काहीच गहाण नसते. जर वैयक्तिक कर्ज घेतले आणि कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक सर्वात अगोदर सहकर्जदार, हमीदार यांच्याशी संपर्क साधते. जर या दोघांनी हात वर केले. बँका या कुटुंबाशी संपर्क करतात. त्यातून फायदा न झाल्यास बँका मग व्यक्तीची खासगी संपत्ती जप्त करून त्यातून वसुली करते. पण जर कर्जदाराकडे कुठलीच संपत्ती नसेल तर असे कर्ज अनुउत्पादित मालमत्ता, नॉन परफॉर्मिंग ॲसेट NPA म्हणून गणली जाते. अशा कर्जाची वसुली होत नाही. हा बँकेचा एकप्रकारे तोटा असतो.