भारतीय बाजारपेठेत दररोज अनेक ब्रँडचे नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच जून ते सप्टेंबर या तिमाहीत स्मार्टफोनचे भारतीय बाजारपेठेत प्रचंड वाढ झाली आहे. आयडीसीच्या अलिकडच्या अहवालात असे दिसून आले आहे की प्रीमियम स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात तेजी दिसून आली आहे. तर अहवालात दिलेल्या माहितीनुसार चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये 18.3 टक्के सह भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत त्यांनी आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे, तर अॅपलने केवळ एका तिमाहीत 5 दशलक्ष आयफोनची आतापर्यंतची सर्वाधिक शिपमेंट पाठवली आहे.
मोबाईल शिपमेंट : कोण पुढे आहे आणि कोण मागे आहे हे जाणून घेऊयात
जून ते सप्टेंबर या तिमाहीत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये जवळपास 21 टक्क्यांनी वाढ होत असताना बाजारपेठेत मोबाईल विक्रीमध्ये विवोने 18.3 टक्के वाटा घेऊन बाजारपेठेत आघाडी घेतली. त्यानंतर ओप्पोने 13.9 टक्के वाट्यासह दुसऱ्या स्थानावर, सॅमसंग 12.6 टक्के वाट्यासह तिसऱ्या स्थानावर तर अॅपल हे 10.4 टक्के वाट्यासह चौथ्या स्थानावर आहे. त्यात रिअलमी 9.8 टक्के वाट्यासह पाचव्या स्थानावर आणि शाओमी कंपनी 9.2 टक्के वाट्यासह सहाव्या स्थानावर आहे.
भारतीय बाजारात महागड्या फोनची वाढती मागणी
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) नुसार, जून ते सप्टेंबर या तिमाहीत 53,000 ते 71,000 युनिट्सपर्यंतच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 43.3 % वाढ झाली आहे. यामुळे प्रीमियम सेगमेंटचा बाजार हिस्सा 4 % वरून 6 % पर्यंत वाढला आहे. हाय-एंड फोन विक्रीमध्ये आयफोन 15, आयफोन 16 आणि आयफोन 17 हे आघाडीवर आहेत.
सुपर प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रचंड वाढ
71,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुपर-प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 52.9% वाढ झाली आहे. या सेगमेंटचा बाजार हिस्सा आता 6% वरून 8% पर्यंत वाढला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की प्रीमियम फीचर्स असलेले हाय-एंड स्मार्टफोन ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.