जी लोकं बोलतात…! वर्कलोड मॅनेजमेंटवरून बोलणाऱ्यांना जसप्रीत बुमराहने सुनावलं
GH News November 15, 2025 12:10 AM

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गोलंदाजीची धार आहे. त्याचं संघात असणं हे प्रतिस्पर्धी संघावर दबावासारखंच आहे. जसप्रीत बुमराह कधीही सामन्याचं चित्र पालटण्याची ताकद ठेवतो. पण गेल्या काही वर्षात बुमराहला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर टीका केली जात आहे. जसप्रीत बुमराह मागच्या एक वर्षापासून नियमितपणे क्रिकेट सामने खेळत नाही. इंग्लंड दौऱ्यातही पाच पैकी तीन सामन्यात खेळला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाजी केली नव्हती. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध नुकताच पार पडलेल्या वनडे सामन्यातही खेळला नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर आरोप होत आहेत. वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावाने स्वत:च सामने निवडतो आणि सोडतो अशी टीका होत आहे. या टीकांवर जसप्रीत बुमराहने भाष्य केलं आहे.

जसप्रीत बुमराहने त्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, या प्रश्नांशी माझं काही देणं घेणं नाही. तब्येतीची काळजी घेण्याकडे लक्ष असतं. बुमराहने कोलकाता कसोटीपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितलं की, ‘मी ज्या फॉर्मेटमध्येही खेळतो तिथे मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. जे लोकं हा प्रश्न विचारत आहेत ते माझे प्रश्न नाहीत. मी त्यांना उत्तर देणार नाही. मला जितकं शक्य होईल तितकं मी खेळत आहे. मी माझ्या शरीराची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी प्रत्येक फॉर्मेटमध्ये चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. आराम, प्रश्न-उत्तर सेशन.. ज्यांना हे करायचं आहे त्यांनी करत राहावं. योगदान देणं आणि नव्या गोष्टी शिकण्यात जितकं यश मिळतं त्यात मी खूश आहे.’

जसप्रीत बुमराह सध्या सलग खेळत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर आशिया कप स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात खेळला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पाच टी20 सामने खेळला. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळत आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने जबरदस्त कामगिरी केली. त्याने फक्त 27 धावा देत 5 गडी बाद केले. तसं पाहीलं तर ही खेळपट्टी फिरकीला मदत करणारी होती. तरीही बुमराहची जादू चालली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.