एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली. या स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि युएई यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार जितेश शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण प्रियांश आर्या 10 धावांवर असताना धावचीत झाला आणि त्यानंतर वैभव सूर्यवंशीचा झंझावात सुरु झाला. वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकलं. तर 42 चेंडूचा सामना करत 342.86 च्या स्ट्राईक रेटने 11 चौकार आणि 15 षटकार मारत 144 धावांची खेळी केली. नमन धीर आणि वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या विकेटसाठी 163 धावांची भागीदारी केली. त्यांनी 57 चेंडूतच 163 धावा केल्या. यात 125 धावांचा वाटा एकट्या वैभव सूर्यवंशीचा होता. नमन धीर बाद झाल्यानंतर कर्णधार जितेश शर्माचं वादळ घोंगावलं. त्यानेही युएईच्या गोलंदाजांना फोडून काढलं. त्याने 32 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 83 धावांची खेळी केली. यासह भारताने 20 षटकात 4 गडी गमवून 297 धावा केल्या आणि विजयासाठी 298 धावा ठेवल्या.
भारताने ठेवलेलं आव्हान गाठताना युएईने नांगी टाकली. अवघ्या 83 धावांवर पाच गडी गमावल्या होत्या. त्यामुळे ही धावसंख्या काही गाठता येणार नाही हे स्पष्ट झालं होतं. युएईकडून शोएब खाने 41 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकार मारत 63 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज आक्रमक खेळी करू शकला नाही. युएईचा संघ 20 षटकात 7 गडी गमवून 149 धावा करू शकला. यासह भारताने पहिल्या सामन्यात 148 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून गुरजपनीत सिंगने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हर्ष दुबेने 2, रमनदीप सिंगने 1, तर यश ठाकुरने 1 विकेट काढली.
भारताला मोठ्या विजयामुळे फायदा झाला आहे. गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. भारताचे 2 गुण असून नेट रनरेट हा +7.400 इतका झाला आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि नेट रनरेट हा +2.00 इतका आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. हा सामना 16 नोव्हेंबरला होणार असून वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.