एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि युएई यांच्याता सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय योग्यच होता असं म्हणावं लागेल. कारण वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडलं. वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पण अवघ्या 16 धावांवर असताना प्रियांश आर्य धावचीत होत तंबूत परतला. त्याने 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 10 धावा केल्या होत्या. प्रियांश बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा झंझावात काही थांबला नाही. त्याने आपल्या शैलीप्रमाणे गोलंदाजांना झोडून काढलं. समोर येईल त्या गोलंदाजाला फोडलं. वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत 10 चौकार आणि 9 षटकार मारत 318.75 च्या स्ट्राईक रेटने शतक ठोकलं.
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्याने 305.88 च्या स्ट्राईक रेटने या धावा काढल्या. यात त्याने 6 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले होते. वैभवने पुढच्या 50 धावा या अवघ्या 15 चेंडूत केल्या आणि शतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स काय त्याला रिलीज करत नाही. उलट त्याच्याकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. वैभव सूर्यवंशी गेल्या काही सामन्यांपासून आपल्या फलंदाजीची धार दाखवून देत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचं दार लवकरच खुलं होणार असं दिसत आहे.
वैभव सूर्यवंशीला नमन धीरची चांगली साथ मिळाली. नमन धीर देखील 150हून अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा काढत होता. त्यामुळे युएईचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. या जोडीमुळे भारताच्या पॉवर प्लेमध्ये 82 धावा झाल्या. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 100हून अधिक धावांची भागीदारी केली. दरम्यान, भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 16 नोव्हेंबरला रविवारी हा सामना होणार आहे.