Kolhapur Election: आरक्षण लागले आणि उमेदवार मैदानात रातोरात बदलले प्रभागांतील फलक; सोशल मीडियावर घोषणांचा महापूर!
esakal November 15, 2025 04:45 AM

कोल्हापूर: मनाप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याचे विविध माध्यमांतून जाहीर केले. बहुतांश जणांनी समाजमाध्यमांचा आधार घेतला असून, अनेकांनी प्रभागात फिरून मतदारांपर्यंत निरोप पोहोचवला आहे.

अनेकांनी आरक्षणानंतर उमेदवारीच बदलल्याने फलकही एका रात्रीत बदलले. अनेकांनी संयम राखत उमेदवारीनंतरच आघाडी उघडण्याचे ठरवले आहे. महापालिकेची आरक्षण सोडत झाली. त्यानुसार कालपासूनच समाजमाध्यमांवरील ग्रुपमध्ये हात जोडलेले तसेच महापालिकेच्या इमारतीचे छायाचित्र टाकून सेवेसाठी तत्पर, असे संदेश फिरवण्यास सुरुवात केली आहे.

Kolhapur Election: आरक्षणानंतर महापालिकेत नवा सारीपाट; इच्छुकांची नवी शर्यत सुरू, समीकरणे पूर्णपणे बदलली!

ज्या-त्या प्रभागाचा नंबर टाकत तेथून निवडणूक लढवत असल्याचेच जाहीर केले. त्यामुळे प्रभागातून इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी महिला आरक्षण पडल्यानंतर पूर्वी स्वतः इच्छुक म्हणून फलक लावणाऱ्यांनी आज अचानक पत्नी, सूनबाई, बहिणीचा फलक लावत उमेदवारी बदलल्याचे जाहीर केले.

अनेकांनी काही दिवसांपासून प्रभागात फेरी मारण्यास सुरुवात केली आहे. पण, आरक्षण निश्चित झाल्यानंतर काहींनी भागात फिरून मतदारांना आठवण करून देण्याचेही काम केले आहे.

Kolhapur Election: आजऱ्यात बदलणार राजकीय समीकरण; नगरपंचायत निवडणुकीत नेत्यांचे ‘सोयीचे’ राजकारण रंगात

पाच वर्षांत चौथ्यांदा प्रक्रिया झाली असून, त्या-त्यावेळचा अनुभव घेतलेल्या काही इच्छुकांनी मात्र संयम दाखवला आहे. उमेदवारीची शक्यता निर्माण होईपर्यंत थांबण्याचा काहींनी निर्णय घेतला आहे.

सौभाग्यवतींना उमेदवारी देण्याचा विचार

अनेक प्रभागांत विविध पक्षांतील पदाधिकारी, माजी नगरसेवक, कारभाऱ्यांना संधी मिळाली आहे. पण, त्यांच्यातील काहींना पक्षाची जबाबदारी पार पाडावी लागणार असून, प्रभागात कमी वेळ मिळण्याच्या शक्यतेने काहींनी पत्नींना उमेदवारी घेण्यासाठीची तयारी चालवली आहे.

तर दोन वेगवेगळ्या प्रवर्गातून संधी असल्याने दोन्हींकडून उमेदवारीची मागणी काहीजण करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात उमेदवारी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.