Chanakya Neeti : पतीने पत्नीच्या या तीन गोष्टी कधीच कोणाला सांगू नयेत, अन्यथा घटस्फोट झालाच समजा
Tv9 Marathi November 15, 2025 05:45 AM

चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूवर भाष्य केलं आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक नात्यावर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये आदर्श पती-पत्नी कसे असावेत? संसार कसा करावा? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? यासंदर्भात अनेक गोष्टी सांगीतल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी ही रथाची दोन चाकं असतात, ती दोन्ही चाके समांतर चालली तरच तो रथ व्यवस्थित धावू शकतो, अन्यथा त्या रथाच्या गतीला ब्रेक लागतो. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात पत्नीच्या या गोष्टी पतीने कधीच कोणाला अगदी आपल्या आई-वडिलांना देखील सांगू नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य म्हणतात पती -पत्नीचं नातं तेव्हाच मजबूत होतं, जेव्हा पती पत्नीच्या नातेवाईकांचा तिच्या आई-वडिलांचा सन्मान करतो, त्यांना योग्य तो आदर देतो, त्याचप्रमाणे पत्नीने देखील पतीच्या आई-वडीलांचा, नातेवाईकांचा आदर केला पाहिजे, त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. पतीने चुकूनही पत्नीच्या माहेरच्या खासगी गोष्टी आपल्या आई-वडि‍लांना, नातेवाईकांना किंवा मित्रांना सांगू नयेत, यामुळे नात्यामध्ये कटूता निर्माण होण्याची शक्यता असते, पती-पत्नीच्या नात्यातील अंतर वाढत गेल्यास परिस्थिती घटस्फोटापर्यंत देखील पोहचू शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पत्नीच्या चुका, सवयी

चाणक्य म्हणतात या जगात कोणताच मानुष्य परिपूर्ण नसतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही न काही कमतरता असते, त्यामुळे पतीने आपल्या पत्नीच्या चुका किंवा तिच्या सवयी दुसऱ्या कोणालाही सांगू नये, त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होण्याची शक्यता असते, या सवयी इतरांना सांगण्याऐवजी स्वत: त्यावर मार्ग काढणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

पत्नीचा भूतकाळ

चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीला एक भूतकाळ असतो, भूतकाळात प्रत्येक व्यक्ती काही न काही चूक करतोच. जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या भूतकाळाबाबत काही कटू गोष्टी माहिती झाल्या तर त्या फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा, तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असा तरीही त्याला कधीच सांगू नका, यामुळे तुमचं नात दीर्घकाळ टिकून राहील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.