वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? इथपासून ते जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी काय उपाय करावेत? इथपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आणि घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात असं वास्तुशास्त्र सांगतं. दरम्यान वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीवर कोणत्या न कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो, जर ग्रह चांगल्या स्थितीमध्ये असेल तर त्या व्यक्तीला चांगलं यश मिळतं, त्याच्या करिअरला गती मिळते, आर्थिक स्थिती उत्तम राहते, मात्र जर ग्रह योग्य स्थानी नसेल तर त्याच्या विपरीत फळ तुम्हाला मिळते, त्यामुळे ग्रहांना शांत करणं गरजेचं असतं, ज्यामुळे आपल्या पाठीमागची पीडा दूर होऊन आपल्याला अपेक्षित यश मिळतं. आज आपण शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रामधील काही उपाय जाणून घेणार आहोत.
भविष्यशास्त्रानुसार शनि देवांना न्यायाची देवता असं म्हटलं गेलं आहे.शनि देव हे कर्मफळ दाता असतात. म्हणजे शनि देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही शनिची दिशा मानली जाते, त्यामुळे पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. जर तुमच्या घराची पश्चिम दिशा ही अस्वच्छ असेल, पश्चिम दिशा ही सामानाने भरलेली असेल, वापरात नसलेलं सामान तुम्ही जर तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला ठेवलं असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी. पश्चिम दिशा शक्यतो मोकळी ठेवावी या दिशेला कोणतंही अडगळीचं सामान ठेवू नये, यामुळे शनि देवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो, आणि घरात आर्थिक स्थैर्य येते, सुख, शांती राहते.
राहु ग्रहाच्या शांतीसाठी उपाय
जर तुमच्या कुंडलीमध्ये राहु ग्रह हा कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात, जसं की व्यवसायात अचानक अडचणी, आर्थिक संकट, आरोग्याच्या समस्या या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुंडलीमधील राहु ग्रह मजबूत करण्यासाठी तुरटीचा एक खडा घ्या, त्याचा भुगा करा, हा भुगा एका फडक्यात बांधा, आणि हा भुगा गंगेच्या पाण्यात धुवून काढा, त्यानंतर त्याला तुमच्या देवघरात ठेवा, तुमचे सर्व संकट दूर होतील, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.