नीरा नरसिंहपूर, ता.१६- पिंपरी बुद्रूक (ता. इंदापूर)चे ग्रामदैवत पीरसाहेब दर्गाहजवळ गोंदी रस्त्यालगत वाळलेले झाड गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायकरीत्या उभे आहे. त्यामुळे भक्तांना व वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून जीव जाण्याची वाट पाहत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पिंपरी बुद्रूक ते गोंदी रस्त्या लगत असलेले पीरसाहेब दर्गाहला चिकटून लिंबाचे भले मोठे उंचच्या उंच झाड वाळवी लागल्याने जळून गेले आहे. हे झाड रस्त्याच्या अगदी लगत उभे असल्याने वाहतुकीस धोकादायक होत आहे. तसेच पीरसाहेब दर्गाहजवळच असल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या जिवाला धोका आहे. अनेकदा विविध ठिकाणी अशी झाडे पडल्याने अपघात झालेले आपण पाहिलेले आहेत. दरम्यान, या रस्त्यावर अशाप्रकारची धोकादायक झाडे उभी असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा याबाबत प्रशासनाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधलेला असतानाही ही धोकादायक झाडे निघत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात पिंपरी बुद्रूक ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ व पदाधिकारी यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तरीसुद्धा वाळलेले धोकादायक झाड काढण्यात आलेले नाही.
05207