मॉडेल इंग्लिश शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
कल्याण, ता. १६ (बातमीदार) : ज्ञान, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलतेचे वलय निर्माण करणारे मॉडेल इंग्लिश हायस्कूलचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन ‘सायन्स फिएस्टा २०२५’ हा दोनदिवसीय उपक्रम नुकताच शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या शाळेने यंदा विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे उत्कृष्ट दर्शन घडवले. विज्ञान शिक्षक कपिल गोम्स यांनी कार्यक्रमाची माहितीपूर्ण प्रस्तावना सादर करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहलाचे संवर्धन करण्याचे महत्त्व सांगितले.
पहिल्या दिवशी दुपारी प्रदर्शन पालकांसाठी खुले करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचा उत्साहाने आस्वाद घेतला. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित किल्ले प्रतापगड या कला-एकात्मिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले. युनेस्कोने दिलेल्या मान्यतेने प्रेरित या सादरीकरणात विद्यार्थ्यांनी इतिहास आणि स्थापत्यकलेचे सुंदर मिश्रण सादर केले. शाळेने प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी डॉ. शैलेश बजाज आणि खान अॅरिझ या दोघांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी नावीन्य, अचूकता आणि सादरीकरण या निकषांवर विद्यार्थ्यांचे काम तपशीलवार पाहिले.
दुसऱ्या दिवशी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट देत प्रदर्शनाचा शैक्षणिक आणि सहयोगी अनुभव घेतला. प्रत्येक विभागातील नावीन्यपूर्ण मॉडेल्स आणि प्रयोगांनी पाहुण्यांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांचा जोश, पालकांचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळे हा उपक्रम शालेय दिनदर्शिकेतील एक संस्मरणीय अध्याय ठरला असल्याच्या भावना समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी व्यक्त केल्या. आयोजित उपक्रमात सचिव आनंदन नायर, प्राचार्या डॉ. शिरीन गोन्सालवेझ, वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शैलेश बजाज आणि भौतिकशास्त्र व एनईईटी विभागप्रमुख खान अॅरिझ यांनी प्रेरणादायी भाषणे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करणे, निर्भयपणे संशोधनाची दिशा धरणे आणि विज्ञानाची आवड टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.