काही वेळा आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जेव्हा पैशांची अचानक गरज भासते. आपत्कालीन स्थिती अथवा घरातील शुभ मंगल कार्यासाठी पैसा लागतो. अशावेळी नातेवाईकांकडे विचारणा करण्याऐवजी अनेकजण थेट बँकेकडे वैयक्तिक कर्जासाठी विनंती करतात. पण तुमचा अर्ज जर वारंवार बँका नाकारत असतील. नकारघंटा देत असतील तर त्याचा अर्थ अगोदर समजून घ्या. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे वैयक्तिक कर्ज सहज मंजूर होईल.
1. क्रेडिट स्कोर तपासा
वैयक्तिक कर्ज मंजुरीसाठी क्रेडिट स्कोअर 750 अथवा त्याहून अधिक असावा लागतो. क्रेडिट स्कोअर आधारे तुम्हाला कर्ज द्यावे की नाही याचा पडताळा करण्यात येतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळत नाही. त्यासाठी क्रेडिट स्कोअर तपासा. हा स्कोअर वाढवण्यासाठी प्रयत्न करा.
2. नोकरी अथवा नियमित उत्पन्नाचे साधन
वैयक्तिक कर्ज मंजुरीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निश्चित नोकरी अथवा नियमीत उत्पन्नाचे साधन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही जर वेळेवर कर्जाचे हप्ते भरू शकाल की नाही याची चाचपणी बँका करतात. त्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत माहिती केल्या जातो. नोकरी आणि उत्पन्न जितके स्थिर असेल, कर्ज मिळण्याची शक्यता तितकी अधिक असते. जर तुमचे उत्पन्न स्थिर असेल तर वैयक्तिक कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही.
3. वयाचे गणित पण समजून घ्या
बँका वैयक्तिक कर्ज देण्यापूर्वी ग्राहकांचे वय पण लक्षात घेतात. तुमचे वय जर 21 ते 60 वर्षादरम्यान असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. बँका तरुणांना कर्ज देण्यास प्राधान्य देतात. कारण त्यांच्याकडे कर्ज फेडीसाठी अधिक काळ आणि कमाई करण्याची आश्वाशकता असते. कमी वयाची मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना बँका वैयक्तिक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.
4. ईएमआय हा की फॅक्टर
EMI आणि सध्या तुम्ही कोणत्या कंपनीत काम करतात हे बँक तपासते. यापूर्वी तुम्ही कोणत्या कारणासाठी कर्ज घेतले. त्या रक्कमेवर किती ईएमआय तुम्ही देत आहात. तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग पूर्वीचे कर्ज फेडण्यातच जात असेल तर बँका नवीन कर्ज देत नाहीत. त्यामुळे जुने कर्ज अगोदर फेडा. ते नियमीत फेडले तर तुमचा क्रेडिट स्कोअर आपोआप वाढेल आणि तुमची आर्थिक शिस्त, नियोजन या आधारे बँक कर्ज देताना तुमचा विचार करेल.