वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने दणका दिला. पहिल्या डावात वरचढ ठरूनही वेस्ट इंडिजने कमबॅक केलं. पाचव्या दिवसापर्यंत खेळ करून न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. वेस्ट इंडिजकडून जस्टीन ग्रीव्ह्स आणि शाई होपची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना रडवलं. तर केमार रोचने तळाशी येत उत्तम खेळी केली. त्यामुळे हा सामना ड्रॉ होण्याशिवाय पर्यायच उतरला नाही. नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला पहिल्या डावात 231 धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 167 धावांवर बाद झाला.
पहिल्या डावात न्यूझीलंडकडे 64 धावांची आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळताना न्यूझीलंडने 8 गडी गमवून 466 धावांवर डाव घोषित केला. यासह आघाडी मिळून 530 धावा झाल्या आणि विजयासाठी 531 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सुरुवातीला धक्के बसले. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडच्या पारड्यात झुकलेला होता. पण शाई होप आणि जस्टीन ग्रीव्ह्स यांनी पाचव्या विकेटसाटी 196 धावांनी भागीदारी केली. शाई होप 140 धावांवर बाद झाला. त्यामुळे संघ अडचणीत आला. टेविन इमलाचही काही खास करू शकला नाही. 4 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर जस्टीन ग्रीव्हसने केमार रोचसोबत सातव्या विकेटसाठी नाबाद 180 धावांची भागीदारी केली आणि संघाला तारलं.
पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने 6 गडी गमवून 457 धावांपर्यंत मजल मारली होती. वेस्ट इंडिजला 73 धावांची गरज होती. तर न्यूझीलंडला 4 विकेट्सची आवश्यकता होता. पण पाचव्या दिवशी षटकं संपली आणि सामना ड्रॉ झाला. या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार द्विशतकी करणाऱ्या जस्टीन ग्रीव्ह्सला मिळाला. त्याने 388 चेंडूंचा सामना केला आणि 19 चौकार मारत नाबाद 202 धावा केल्या. हा सामना ड्रॉ झाल्याने गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. न्यूझीलंडचा संघ 33.33 विजयी टक्केवारीसह सातव्या क्रमांकावर, तर वेस्ट इंडिज 5.56 विजयी टक्केवारीसह शेवटच्या स्थानावर आहे.