प्रसिध कृष्णा आणि कुलदीप यादव या टीम इंडियाच्या जोडीने कमाल बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. विशाखापट्टणममध्ये आयोजित या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने रायन रिकेल्टन याला झिरोवर आऊट करत अप्रतिम सुरुवात केली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा या जोडीने शतकी भागीदारी केली. तर कॉकने मॅथ्यू ब्रिट्झके याच्यासह अर्धशतकी भागीदारी केली.त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सहज 300 पार पोहचण्याची संधी होती. मात्र कुलदीप आणि प्रसिध या दोघांनी उल्लेखनीय बॉलिंग करत दक्षिण आफ्रिकेचं 47.5 ओव्हरमध्ये 270 रन्सवर पॅकअप केलं. त्यामुळे आता टीम इंडिया 271 धावा करुन सामन्यासह मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.