IND vs SA : यशस्वीचा शतकी तडाखा, रोहित-विराटचं चाबूक अर्धशतक, भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा हिशोब
GH News December 07, 2025 12:10 AM

यशस्वी जैस्वाल याचं शतक आणि रोहित शर्मा तसेच विराट कोहली या अनुभवी जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या-अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत आणि एकतर्फी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 61 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 39.5 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. भारताने यासह ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने मालिकेत विजयी सलामी दिली होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात केली. तर रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असा होता. मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवत कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेड केली.

टीम इंडिया ‘यशस्वी’

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने भारताच्या विजयाची स्क्रीप्ट लिहीली. यादोघांनी दीडशतकी भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. दोघांनी संयमी सुरुवात केली. दोघांनी ठराविक धावांनंतर गिअर बदलला. रोहितने या भागीदारी दरम्यान अर्धशतक झळकावलं. रोहितला शतक करण्याची संधी होती. मात्र रोहित फटकेबाजी करताना आऊट झाला. रोहितने 75 रन्स केल्या. रोहित आऊट होताच धावांची सलामी जोडी फुटली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. यशस्वीने विराटसह फटकेबाजी करत अर्धशतकानंतर शतकही झळकावलं. यशस्वीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच विराटनेही अर्धशतक ठोकलं. याच जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी नॉट आऊट 84 बॉलमध्ये 116 रन्सची पार्टनरशीप केली. यशस्वीने 116 तर विराटने 65 धावांची खेळी साकारली.

भारताचा मालिका विजय

कुलदीप-कृष्णाचा कहर

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अर्शदीप सिंह याने रायन रिकेल्टन याला आऊट करत दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. त्यानंतर क्विंटन डी कॉक याने टेम्बा बवुमा याच्यासह दुसर्‍या विकेटसाठी शतकी तर तिसऱ्या विकेटसाठी मॅथ्यू ब्रिट्झकेसह अर्धशतकी भागीदारी केली. क्विंटन डी कॉक 106 आणि टेम्बा बवुमा याने 48 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सहज 320 पेक्षा अधिक धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र प्रसिध कृष्णा आणि कुलदीप या यादव या भारताच्या वेगवान आणि फिरकी जोडीने कमाल केली. या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचं 47.5 ओव्हरमध्ये 270 रन्सवर पॅकअप केलं. तर अर्शदीप सिंह आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.