रोखठोक – डॉ. आंबेडकरांचे महाराष्ट्रावरील उपकार!
Marathi December 07, 2025 09:26 AM

आज मुंबई पुन्हा एकदा वादळात सापडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्रित महाराष्ट्र लढ्यात 'मुंबई महाराष्ट्राचीच' हे ठाम भूमिका घेतली. तर्कशुद्ध ऐतिहासिक भौगोलिक पुरावे मांडले. महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचा परिणाम मुंबई महाराष्ट्राला मिळण्यात झाला. आता पुन्हा नवा लढा उभा राहील!

कालावधी 6 डिसेंबर झाला! याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून शरीराने निघून गेले, पण त्यांचा विचार कायम आहे.

4 तारखेला मी वरळी सागरी पुलाकडून प्रभादेवीच्या दिशेने येत असताना पाहिले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून जे लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या दर्शनाला येतील, त्यांच्या लांबलचक रांगांसाठी दादरच्या चैत्यभूमीपासून वरळी सागरी पुलापर्यंत बांबूंचे कठडे बांधण्याचे काम सुरू होते. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे भाग्य डा. आंबेडकरांना लाभले. डॉ. आंबेडकरांनी भारताला संविधान दिले. भारतीय घटनेचे ते शिल्पकार आहेत. आज संविधानावर रोज हल्ले होत असताना डॉ. आंबेडकरांचे स्मरण करायलाच हवे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवृत्त होताना सांगितले, ‘डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता की, न्यायपालिका स्वतंत्र असायलाच हवी. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य जपायला हवे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळसारख्या राष्ट्रांत काय झाले ते सगळ्यांनीच पाहिले. देशात व बाहेरच्या अनेक समस्यांनी ग्रासलेला भारत आजही अखंड आहे. ही संविधानाची देणगी आहे. हे डॉ. आंबेडकरांचे आपल्यावर उपकार आहेत.’ आज पुन्हा एकदा मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न दिल्लीचे सध्याचे राज्यकर्ते आणि गुजरातच्या धनपालांनी सुरू केले आहेत. अशा वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी माणूस व मुंबईसाठी दिलेल्या लढ्याची आठवण येते. मुंबई गुजरातची किंवा मुंबई केंद्रशासित करण्याच्या हालचाली सुरू असताना डॉ. आंबेडकर पुढे सरसावले व ‘मुंबई महाराष्ट्राचीच’ हे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले. त्या वेळी महाराष्ट्र विरोधकांनी जे नऊ प्रश्न उभे केले होते. त्यांना बाबासाहेबांनी चोख उत्तरे दिली. ते प्रश्न असे –

मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?

मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नाही हे कशाच्या आधारावर म्हणता?

मराठी भाषिकांची संख्या मुंबईत सर्वाधिक नाही असे कसे म्हणता येईल? मराठी बहुमत मुंबईत आहेच.

गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत असे कशाच्या आधारावर म्हणता?

मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?

मुंबईचा व्यापार, उद्योग हा गुजरात्यांनी उभा केलाय. मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?

मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे म्हणून मुंबईवर महाराष्ट्र दावा सांगतोय का?

बहुभाषिक राज्य चांगले असते. कारण तिथे अल्पसंख्याक भाषिकांना अभय असते हे बरोबर नाही काय?

‘राज्याची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको’ हा दावा योग्य आहे काय? या प्रश्नांची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले. बाबासाहेब त्यांच्या लेखात म्हणतात, ‘मुंबईला पाणी कोण पुरवते? महाराष्ट्र की गुजरात? ज्या विजेवर हे गुजरात्यांचे व्यापार-उदीम चालतात ती वीज कोठून येते? महाराष्ट्रातून की गुजरातमधून? कामगार शक्ती कुठली आहे?’ वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची, तर मुंबईवर हक्कही महाराष्ट्राचाच, असे डॉ. आंबेडकरांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्राच्या विरोधात उभ्या केलेल्या नऊ प्रश्नांवर डॉ. आंबेडकरांनी केलेले विवेचन तर्कशुद्ध आणि अभ्यासू आहे.

डॉ. आंबेडकरांचा तर्कशास्त्र

डॉ. आंबेडकर हे ‘मुंबई महाराष्ट्राचीच’ या भूमिकेवर ठाम राहिले व त्यांनी याबाबत पंडित नेहरूंशी वाद केला. डॉ. आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्राचे, भाषिक महाराष्ट्राचे, भाषिक राज्याचे अत्यंत कट्टर पुरस्कर्ते होते. डॉ. आंबेडकर मुंबईवर महाराष्ट्राचाच दावा ठळक करताना सांगतात, “महाराष्ट्रीयांनी गुजरातवर जय मिळवून अनेक वर्षे त्यांच्यावर राज्य केले. गुजरात्यांवर काय परिणाम झाला? काहीही नाही. गुजराती गुजराती राहिले आणि महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय राहिले.” बाबासाहेब पुढे सांगतात, “दमण ते कारवारपर्यंत अखंड किनारपट्टी जर महाराष्ट्राचा भाग असेल, तर मुंबई महाराष्ट्राचा भाग नाही हे कसे काय सांगितले जाऊ शकते? मुंबई महाराष्ट्राचीच हे तर निसर्गाचे अटळ, अपरिवर्तनीय सत्य आहे. भौगोलिक सत्य हेच आहे की, मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. ज्यांना निसर्गाच्या सत्याला आव्हान द्यायचे असेल त्यांना खुशाल देऊ द्या. मराठ्यांना मुंबईला आपल्या साम्राज्यात सामावून घेण्याची गरज वाटली नाही. त्यामुळे भौगोलिक सत्य बदलत नाही. मराठ्य़ांना मुंबई अमलाखाली आणायची गरज वाटली नाही याचे कारण इतकेच आहे की, मराठा सत्ता ही जमिनीवर अंमल करत होती. त्यांना सागर बंदर जिंकणे, विकसित करणे, त्यावर ऊर्जेचा, द्रव्याचा व्यय करणे याची त्यांच्या काळात गरज वाटत नव्हती.” डॉ. आंबेडकरांचे मुंबईवरील महाराष्ट्राच्या दाव्याचे हे समर्थन आहे.

अभिवादन!

डॉ. आंबेडकरांचे मुंबईवर, महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर उपकार आहेत. प्रबोधनकार ठाकरे सांगत, महाराष्ट्राची दोनच दैवते आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ते खरेच आहे. डॉ. आंबेडकरांनी मानवतेचा विचार दिला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यासाठी जबरदस्त संघर्ष केला. मानव समाजावरील आणि हिंदू धर्मावरील अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर युद्ध पुकारले. अखेर भारतीय घटनेद्वारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे महत्त्व मान्य करून 1950 मध्ये अस्पृश्यता हा गुन्हा ठरविला गेला. त्यानंतर 1956 मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन मानवतेला मुकलेल्या माणसाला डॉ. आंबेडकरांनी अस्मिता बहाल केली. स्वतःचे व्यक्तिमत्त्व दिले. हा संपूर्ण लढा देशहिताला थोडाही धक्का लागू न देता त्यांनी दिला. समाजाचा एक फार मोठा भाग विकलांग असेल तर समाज सशक्त होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवास विनम्र अभिवादन!

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- rautsanjay61@gmail.com

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.